दै. गोवन वार्ता इफेक्ट : आठवडाभर सर्व व्यवहार ठप्प
म्हापसा : येथील नगरपालिका कार्यालयाची खंडित झालेली इंटरनेट सेवा राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) पूर्ववत केली आहे. परिणामी आठवड्याभरानंतर पालिकेचा बंद पडलेला आर्थिक व्यवहार सुरळीत झाला आहे.
वीज खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार म्हापसा शहरातील टीव्ही व इंटरनेट केबल्स गेल्या दि. १८ जानेवारी रोजी कापून टाकले होते. म्हापसा पालिकेला डिजीटल इंडिया अंतर्गत राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रातर्फे (एनआयसी) इंटरनेट सेवेची सुविधा उपलब्ध केलेली इंटरनेट केबल वाहिनीही यावेळी कापण्यात आली होती. त्यामुळे या कारवाईचा थेट फटका म्हापसा नगरपालिकेला बसला होता.
इंटरनेट संबंधीत सर्व दैनंदिन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने पालिकेच्या लाखो रूपयांच्या महसूलावर परिणाम झाला होता. तसेच लोकांना नाहक पालिका कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. आठवड्याभरापासून ही समस्या उद्भवल्याने म्हापसा पालिकेला वाली कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करीत होते.
याबाबतचे वृत्तांक दै. गोवन वार्ताने बुधवारी २९ रोजी प्रसिद्ध केले होते. याची दखल घेऊन पालिका मंडळ आणि पालिका अधिकारी खडबडून जागे झाले. वीज अधिकारी आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) अधिकाऱ्यांशी तत्काळ संपर्क करण्यात आला व यावर तोडगा काढण्याची विनंती केली.
आजपासून सर्व व्यवहार होणार सुरळीत
त्यानंतर एनआयसीच्या अधिकाऱ्यांनी म्हापसा पालिकेची ही इंटरनेट जोडणी बुधवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास पूर्ववत सुरू केली. त्यामुळे गेले आठ दिवस ठप्प झालेले जन्म- मृत्यू दाखला, व्यापार परवाना कर, घरपट्टी कर, घरपट्टी हस्तांतरण व नूतनीकरण, वीज व पाणी एनओसी, बांधकाम परवाना, घर दुरुस्ती परवाना, भोगवाटा प्रमाणपत्र, नवजात बालिका योजना सारख्या सरकारी योजनांचे मंजूरीपत्र, उत्पन्नाचा दाखला या इंटरनेटवर अवलंबून असलेल्या सुविधा पुन्हा सुरू झाल्या. उद्यापासून पालिकेतील सर्व व्यवहार सुरळीत सुरू राहणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.