काले येथील फोमेन्तोच्या खाण ब्लॉकचे ग्रामस्थांकडून स्वागत

सावर्डे येथील सार्वजनिक सुनावणीला ग्रामस्थांचा प्रतिसाद


30th January, 12:31 am
काले येथील फोमेन्तोच्या खाण ब्लॉकचे ग्रामस्थांकडून स्वागत

सावर्डे येथील सार्वजनिक सुनावणीला उपस्थित ग्रामस्थ.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : काले येथील फोमेन्तो कंपनीच्या खाण ब्लॉकला स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दर्शवला आहे. रोजगार तसेच व्यवसायांवर आलेली मंदी लवकर दूर होण्यासाठी लवकरात लवकर खाण ब्लॉक सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी सार्वजनिक सुनावणीवेळी केली.
काले फोमेन्तो कंपनीच्या खाण ब्लॉकविषयीची सार्वजनिक सुनावणी सावर्डेतील सभागृहात पार पडली. सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सार्वजनिक सुनावणीला उपस्थित होते. सार्वजनिक सुनावणीवेळी ७० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. खाण ब्लॉक शक्य तितक्या लवकर सुरू करण्याची मागणी उपस्थित ग्रामस्थांनी केली. रोजगार उपलब्ध होण्यासाठी खाणी सुरू होण्याची आवश्यकता आहे, असे मत ग्रामस्थांनी यावेळी मांडल्याची माहिती सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद वेळीप यांनी दिली. सार्वजनिक सुनावणीचे इतिवृत्त संबंधित खात्यांना सादर करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सीएसआर कार्यक्रमाखाली फोमेन्तो कंपनीने कश्टी काले पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबवले आहेत, असेही ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.