पोलिसांकडून तीन ग्रीन कॉरिडॉर : पतीच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी पत्नीचा निर्णय
पणजी : मणिपाल इस्पितळात ब्रेन डेड असणाऱ्या रुग्णाच्या पत्नीने रुग्णाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेतल्याने तीन व्यक्तींना जीवदान मिळाले आहे. यानुसार राज्य अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेने (सोटो) गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ), हेल्थवे येथील गरजू रुग्णांना प्रत्येकी एक मूत्रपिंड (किडणी), तर इंदूरमधील इस्पितळात भरती असणाऱ्या रुग्णाला यकृत (लिव्हर) दान करण्याची परवानगी दिली. अवयवदान प्रक्रिया जलदगतीने करण्यासाठी गोवा पोलिसांनी तीन ग्रीन कॉरिडॉर तयार केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपाल इस्पितळातील कर्मचारी असणाऱ्या ४८ वर्षीय व्यक्तीला ब्रेन हॅम्रेज झाल्याने त्यांना इस्पितळात भरती करण्यात आले होते. यानंतर येथील डॉक्टरांनी त्यांना ब्रेन डेड घोषित केले. रुग्णाच्या पत्नीने आपल्या पतीच्या आठवणी जाग्या ठेवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी पतीचे अवयव दान करण्यास परवानगी दिली. यानंतर सोटो संस्थेने मणिपाल, गोमेकॉ, हेल्थवे आणि ज्यूपिटर (इंदूर) या इस्पितळाशी समन्वय साधून अवयवदानाची प्रक्रिया सुरू केली.
याआधी २०१८ मध्ये मणिपाल इस्पितळातील बी सदाशिव राव यांच्या कुटुंबियांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता. सोटो गोवा, मणिपाल इस्पितळ, गोवा पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, दाबोळी आणि मोपा विमानतळावरील विमानतळ अधिकारी यांच्या सहकार्यामुळे हे अवयवदान शक्य झाल्याचे सोटो संस्थेने म्हटले आहे. याआधी २८ जानेवारी रोजी गोमेकॉमध्ये भरती असलेल्या रुग्णाने अवयवदान केल्याने पाच व्यक्तींचे प्राण वाचवण्यात यश आले होते.
हेल्थवे, गोमेकॉ, सोटोमधील
रुग्णांना अवयवदान
सोटो संस्थेने हेल्थवे हॉस्पिटलमधील ३४ वर्षीय पुरुष, तर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) ४२ वर्षीय महिला रुग्णाला प्रत्येकी एक मूत्रपिंड देण्याची परवानगी दिली. नोंदणीकृत किडनी प्रत्यारोपण रुग्णालय असलेल्या मणिपाल रुग्णालयाच्या प्रतीक्षा यादीत कोणताही योग्य प्राप्तकर्ता नव्हता. तर पश्चिम विभाग अवयव व पेशी प्रत्यारोपण संस्थेने (सोटो) इंदूर येथील विशेष ज्युपिटर इस्पितळातील ६७ वर्षीय प्राप्तकर्त्याला यकृताचे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला.