कर्मचारी भरती : एलडीसीच्या पुढील परीक्षेसाठी होणार १,१६० उमेदवारांची निवड

भरती पदांच्या पाचपट उमेदवार निवड करण्याचे धोरण


30th January, 12:34 am
कर्मचारी भरती : एलडीसीच्या पुढील परीक्षेसाठी होणार १,१६० उमेदवारांची निवड

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : एलडीसी पदांसाठीच्या पुढील सीबीआरटी परीक्षेसाठी अधिक गुण मिळालेल्या एकूण १,१६० उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. कर्मचारी भरती आयोगाच्या सूत्रांकडून ही माहिती मिळाली. एक पद असेल तर ५ उमेदवार याप्रमाणे पुढील परीक्षेसाठी निवड केली जाईल. एलडीसीची २३२ पदे आहेत. त्यामुळे पुढील सीबीआरटीसाठी गुणांवर आधारित १,१६० उमेदवारांची निवड केली जाईल.
एलडीसीच्या २३२ पदांसाठी २२ हजार ४५ अर्ज आले होते. पैकी १८,७१८ उमेदवार परीक्षेला बसले. हे प्रमाण ८५ टक्के आहे. यातील अधिक गुण मिळालेल्या १,१६० उमेदवार पुढील परीक्षेसाठी पात्र ठरतील. आता दोन दिवसांत उमेदवाराच्या लॉग ईन आयडीवर त्याची उत्तरपत्रिका दिली जाईल. त्यावरून आपली उत्तरे बरोबर होती की चूक हे उमेदवारांना कळू शकणार आहे. कोणत्या प्रश्नाला गुण मिळाले आणि कोणत्या प्रश्नाला गुण मिळाले नाही, हे उमेदवारांना कळण्यास मदत होईल. यानंतर तक्रार करण्याची संधी उमेदवारांना मिळेल. गुणांविषयी काही शंका असल्यास अर्ज भरून तो आयोगाला सादर करावा लागेल. अर्जाचा नमुना तसेच सादर करण्याच्या तारखेची नोटीस संकेतस्थळावरून जाहीर केली जाईल. यानंतर तज्ज्ञ समिती तक्रारींवर निर्णय घेईल. तक्रारींवर निर्णय झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल. पुढील परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. ११ जानेवारी, १२ जानेवारी, १८ जानेवारी, १९ जानेवारी आणि २५ जानेवारी या दिवशी परीक्षा घेतली जाणार आहे.
स्थानिकांना प्राधान्य देण्यासाठी कोकणीचा समावेश
भरतीसाठी कर्मचारी भरती आयोगाने घेतलेल्या सीबीआरटीचा निकाल आयोगाने ४८ तासांत जाहीर केला होता. परीक्षेला बसलेल्या सर्व उमेदवारांचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तशेच स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी सीबीआरटीमध्ये कोकणीचाही समावेश केला आहे.