बार्देशमधील पाणी समस्येस जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई

मुख्यमंत्री : गणेश मंदिर विद्यालयाच्या सभागृहाचे उद्घाटन


30th January, 12:28 am
बार्देशमधील पाणी समस्येस जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : तिळारीच्या कालव्याला भगदाड पडल्याने नव्हे, तर जलस्रोत खात्याच्या निष्काळजीपणामुळे बार्देश तालुक्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. खात्याच्या संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.


गणेशपुरी, म्हापसा येथील गणेश मंदिर विद्यालयाच्या सभागृहाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत इतर.
बुधवारी येथील श्री गणेश विद्यामंदिरच्या शिशुवाटिका सभागृह, उद्यान, बहुउद्देशीय सभागृह व संकेतस्थळाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष डॉ. नूतन बिचोलकर, वाहतूक खात्याचे साहाय्यक संचालक मिनेश तार, शाळेचे चेअरमन राजेश भटकुर्से, शशंद्री डांगी, संदीप पाळणी, काशी शिरोडकर उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, आमठाणे धरणाचे गेट बुधवारी पहाटे उघडले गेले. त्यामुळे बार्देशला मुबलक पाणीपुरवठा होईल. पाणी समस्येबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आमठाणे धरणाचे गेट उघडण्यास सात दिवस दिरंगाई होते. या प्रकाराला जबाबदार जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांवर सक्त कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
एनईपीच्या अंमलबजावणीसाठी शिक्षण संस्था व व्यवस्थापनांची मदत अपेक्षित आहे. या शिक्षण प्रणालीतून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे हा प्रमुख उद्देश आहे. हल्ली पाठांतरावर जास्त भर दिला जातो, त्यापेक्षा विद्यार्थ्याची ज्ञानेंद्रिये जागृत करणे अधिक महत्त्वपूर्ण असते. हा आदर्श श्री गणेश विद्यामंदिरने शिशुवाटिकेच्या स्वरूपात घातल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले..
इयत्ता सहावीपासून एनईपीची अंमलबजावणी
आगामी शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली जाईल. इयत्ता सहावीपासून हे धोरण अमलात आणले जाईल. राष्ट्रीय शिक्षण धोरणाअंतर्गत ज्या खासगी संस्थांना आपल्या संस्था सुरू करायच्या आहेत, त्यांना नोंदणी करण्याची सूचना केली आहे.
पाच दिवसांनंतर पाण्याची समस्या सुटली
आमठाणे धरणाची पाणी जोडणी पूर्ण क्षमतेने मिळाल्यामुळे अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत झाला. या प्रकल्पातून तालुक्याला बुधवारी सांयकाळपासून मुबलक पाणीपुरवठा सुरू झाला. त्यामुळे पाच दिवसांनंतर ही पाणी समस्या सुटली आहे.