कोणत्याही नात्यात दुसऱ्याला लेक्चर देण्यापेक्षा संभाषण करणे आवश्यक !

गौर गोपाळ दास यांचे मार्गदर्शन : पणजीत डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
कोणत्याही नात्यात दुसऱ्याला लेक्चर देण्यापेक्षा संभाषण करणे आवश्यक !

डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत गौर गाेपाळ दास, मंत्री गोविंद गावडे व इतर.

पणजी : आपल्या आयुष्याची जबाबदारी ही आपलीच असते. ही जबाबदारी दुसऱ्याला देणे म्हणजे स्वतःच्या आयुष्याच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हाती देण्यासारखे आहे, असे मत प्रसिद्ध वक्ते आणि अाध्यात्मिक गुरू गौर गोपाळ दास यांनी व्यक्त केले. सोमवारी पणजीत कला संस्कृती खात्यातर्फे आयोजित १४ व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, खात्याचे संचालक सगुण वेळीप यांच्यासह मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
उद्घाटनानंतर 'रिलेशनशिप अॅण्ड लाईफ' या विषयावर बोलण्यासाठी वक्ते गौर गोपाळ दास यांनी व्यासपीठावर न थांबता प्रेक्षकांत जाऊन त्यांच्याशी थेट संवाद साधला. ते म्हणाले, आपले आयुष्य हे विमान प्रवासाप्रमाणे असते. टेक ऑफ म्हणजे जन्म आणि लँडिंग म्हणजे मृत्यू. या विमान प्रवासादरम्यान काही वेळेस टर्ब्यूलन्स येतो. तसेच आपल्या आयुष्यात देखील समस्या येतात. या अडचणींवर आपले नियंत्रण नसते. त्यामुळे आपल्या हाती नसलेल्या गोष्टींसाठी स्वतःची ऊर्जा, वेळ, बुद्धी खर्च करू नये. आयुष्यात अडचणी येणारच मात्र हा प्रवास सुखकर करणे आपल्या हाती असते.
ते म्हणाले, नातेसंबंधात लोक एकमेकांना समजून घेण्यापेक्षा दुसऱ्याला समजावून सांगण्यात धन्यता मानतात. कोणत्याही नात्यात दुसऱ्याला लेक्चर देण्यापेक्षा संभाषण करणे आवश्यक असते. नात्यात शांतता असेल तर ती नक्कीच चांगली गोष्ट नसते. अशी शांतता दुसऱ्या प्रती असलेल्या भीतीमुळे, असहकार्याच्या भावनेमुळे आहे का याचाही विचार झाला पाहिजे. कोणतीही व्यक्ती ज्यावेळी मोठ्या हुद्द्यावर जाते तेव्हा ती एकटी होण्याची शक्यता असते. अशावेळी देखील चांगले नातेसंबंध उपयोगी पडतात.

गौर गोपाळ दास म्हणाले...
- तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे करत राहाल तर एक दिवस यश नक्कीच मिळेल. तुमची कौशल्ये ओळखून त्यावर काम करणे सुरू करावे.
- फुलपाखरांच्या मागे धावलात तर ते पळून जातील. याउलट बागेत चांगली झाडे लावल्यास तिथे अनेक फुलपाखरे आपोआप येतील. आपले आयुष्यही असेच आहे. यशाच्या मागे धावू लागला तर ते तुमच्यापासून लांब जाईल.
- प्रत्येक गोष्टीचा ताण घेणे सोडून द्यावे. खोट्या सकारात्मक विचारांच्या माऱ्यापासून सावध राहावे. कधी कधी नकारात्मक विचार येणे हेही मानवी स्वभावात असते.