माता, नवजात बालकांना मिळणार खात्रीशीर आरोग्य सुविधा

‘सुमन’अंतर्गत राज्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज


8 hours ago
माता, नवजात बालकांना मिळणार खात्रीशीर आरोग्य सुविधा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : केंद्र सरकारच्या ‘सुरक्षित मातृत्व आश्वासन’ (सुमन) योजनेअंतर्गत राज्यातील ५० प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २१ कम्युनिटी केंद्रात माता तसेच नवजात बालकांना चांगल्या दर्जाची खात्रीशीर आरोग्य सेवा मिळणार आहे. याबाबत आरोग्य खात्याने नुकताच आदेश जारी केला आहे. यामध्ये मोफत आरोग्य सुविधा, मातांचे समुपदेशन, विशिष्ट प्रकरणात प्रसूतीनंतर घरी जाण्यासाठी मोफत वाहतूक, कुटुंब नियोजनासाठी औषधे आणि समुपदेशन देणे अशा विविध सेवांचा समावेश आहे.
‘सुमन’नुसार गर्भवती महिलांना आरोग्य सेवा देणे बंधनकारक आहे. यामध्ये महिलांचा सन्मान, भावना, प्रतिष्ठा आणि त्यांची निवड यांचा आदर केला जाणार आहे. गर्भवती महिलांना कुटुंब नियोजन, सुरक्षित मातृत्वासाठी माहिती पुस्तिका देण्यात येईल. त्यांना प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून आरोग्य सेवा देण्यात येतील. बालकांना स्तनपान देण्यासाठी मातांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. स्तनदा मातांची विशेष काळजी घेतली जाईल. आरोग्य केंद्रात स्वच्छतेची काळजी घेतली जाईल.
योजनांचे पैसे बँक खात्यात जमा होणार
‘सुमन’अंतर्गत पात्र मातांच्या बँक खात्यात जननी सुरक्षा आणि पीएम मातृ वंदना आणि अन्य राज्यस्तरीय योजनांचे पैसे जमा करण्यात येतील. आरोग्य सेवांबाबत असलेल्या तक्रारी ‘सुमन’ वेब पोर्टल, कॉल सेंटर, हेल्पलाइन, एसएमएस याद्वारे निकाली काढण्यात येणार आहेत. याशिवाय सुमनमध्ये एचआयव्ही चाचण्या करणे, नवजात बालकांना लस देणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, आवश्यक प्रकरणात त्यांची घरी जाऊन तपासणी करणे यांचा समावेश आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.