पश्चिमी राज्यांतील मुख्यमंत्र्यांकडूनही कौतुक
पणजी : गोव्यातील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राज्य सरकार राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे पश्चिम विभागातील राज्यांनी कौतुक केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या पश्चिमी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यातील घनकचरा व्यवस्थापनाची माहिती दिली.
या बैठकीला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, दादरा नगर हवेली आणि दमण दीवचे प्रशासक प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते. पश्चिम विभागात येणाऱ्या राज्यातील साधनसुविधा आणि विकासात्मक कामांवर बैठकीत चर्चा झाली. पायाभूत सुविधांसह आरोग्य, शिक्षण आदींसारख्या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या कामांचा आढावा अमित शहा यांनी या बैठकीत घेतला.
यावेळी डॉ. प्रमोद सावंत यांनी घनकचरा व्यवस्थापनाबाबत गोव्याने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती बैठकीत दिली. गोव्याकडून यासंदर्भात राबवण्यात येणारे उपक्रम सुटसुटीत असून, ते इतर राज्यांसमोर आदर्श असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे इतर मुख्यमंत्र्यांकडूनही या उपक्रमांचे कौतुक करण्यात आले.