लवकरच होणार बैठक; मेघना शेटगावकर यांची माहिती
पणजी : नव्या शैक्षणिक धोरणाची (एनईपी) आगामी शैक्षणिक वर्षापासून सहावी आणि दहावी या दोन इयत्तांसाठी अंमलबजावणी करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. सोबतच, पहिली ते तिसरी या इयत्तांसाठीही याच वर्षांत ‘एनईपी’ लागू करण्याचा विचार सरकार पातळीवर सुरू आहे. परंतु, त्याबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नाही, अशी माहिती राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या संचालिका (एससीईआरटी) मेघना शेटगावकर यांनी दिली.
आगामी शैक्षणिक वर्षात सहावी आणि दहावी या दोन इयत्तांसाठी ‘एनईपी’ची अंमलबजावणी करण्याचे निश्चित झालेले आहे. सोबतच सातवी आणि आठवी या दोन इयत्तांसाठी पुढील वर्षापासून धोरण राबवण्याचेही ठरले आहे. परंतु, पहिली ते तिसरीपर्यंतच्या इयत्तांसाठी या धोरणाची कधीपासून अंमलबजावणी करायची याचा निर्णय अजून झालेला नाही. त्यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी पुढील काहीच दिवसांत बैठक होणार आहे. त्यातच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे शेटगावकर यांनी सांगितले.
सहावीसाठी भाषा (कोकणी/मराठी), इंग्रजी, हिंदी/इतर भारतीय भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, व्यावसायिक (व्होकेशनल) शिक्षण, शारीरिक शिक्षण व कला शिक्षण (आर्ट) हे विषय असतील. तीन भाषा व इतर सहा विषय मिळून नऊ विषय होतात.