मेरी फर्नांडिसवर शोकाकूल वातावरणात अत्यंसंस्कार
पेडणे : मांद्रे जुनसवाडा येथील मेरी फेलिझ फर्नांडिस या ७० वर्षीय महिलेच्या अंगावर गाडी घालून दीपक राजू बत्राने तिला ठार मारले. दरम्यान, मांद्रे पोलिसांनी दीपन बत्राला अटक करून थेट न्यायालयीन कोठडी दिली होती. त्यासंदर्भात स्थानिकांसह आमदार जीत आरोलकर यांनी संशयिताला न्यायालयीन कोठडीऐवजी पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असून जोपर्यंत मेरी फर्नांडिसच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण त्यांच्यासोबत असणार असल्याचे आमदार आरोलकर यांनी सांगितले. दरम्यान, मेरी फेलीज हिच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जुनसवाडा येथील मेरी फर्नांडिस ही महिला आपल्या घराच्या बाजूलाच रस्त्यावर शहाळी विकत होती. त्या रस्त्यावरून काही दिवसांपासून दीपन राजू बत्रा (२३) हा नवी दिल्ली येथील फिल्म मेकर नागरिक तेथून रोज आपल्या कुत्र्यांना घेऊन जात असे. याच वेळी मेरी फर्नांडिस हिचे दोन कुत्रे त्या कुत्र्यावर धावून जायचे आणि गोंधळ सुरू व्हायचा. त्यामुळे मेरीने त्याला वारंवार विनवण्या केल्या की येथून कुत्र्यांना घेऊन जाऊ नकोस. परंतु, त्या पर्यटकाची दादागिरी दिवसेंदिवस वाढत होती. याच कुत्र्यांच्या भांडणावरून बत्रा याने मेरी फर्नांडिसच्या अंगावर गाडी घालून तिची हत्या केली. त्या संदर्भात दीपन बत्रा याला मांद्रे पोलिसांनी अटक करून थेट न्यायालयीन कोठडी दिली होती.
दीपन राजू बत्रा हा पर्यटक दररोज मेरी फेलिझ फर्नांडिस हिच्या घराकडून जात असे. सदर रस्ता अरुंद असून दीपन बत्रा त्या मार्गावरून सुसाट वेगाने वाहन हाकत असे. स्थानिकांनी त्याला वाहन जोरात न चालवण्यासाठी विनवणी केली होती. शिवाय, त्याला या लोकवस्तीमधून कुत्री घेऊन जाऊ नकाे, अशी विनवणीही वारंवार करण्यात आली होती. मात्र, बत्राने ऐकले नाही.
मेरी फर्नांडिसची घरची परिस्थिती हलाखीची
मेरी फेलिज फर्नांडिसचे राहते घर अत्यंत धोकादायक स्थितीत असून ते केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबियांना सरकारने लवकरात लवकर आर्थिक मदत करून तिला नवीन घर उभारून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.