पणजी : गोवा पोलिसाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) मोरजी येथे छापा टाकून रशियन नागरिकाला अटक केली होती. त्याच्याकडून १.७५ कोटी रुपयाच्या ड्रग्स जप्त केला. या प्रकरणातील संशयित कारावासात असताना त्याच्याकडे ड्रग्स सापडल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने सर्गेई रोझनोव्ह या रशियन नागरिकाचा जामीन फेटाळला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला.
या प्रकरणी एएनसीने १४ डिसेंबर २०२३ रोजी मोरजी येथील खिंड गार्डन परिसरात छापा टाकला. त्यानुसार, अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी एक विदेशी नागरिक येणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार, निवृत्त पोलीस अधीक्षक बाॅसिएट सिल्वा आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सजिंत पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन उपनिरीक्षक प्रियंका गारुडी याच्या नेतृत्वाखाली हवालदार उमेश देसाई, काॅन्स्टेबल नितेश मुळगावकर, संदेश वळवईकर, मंदार नाईक, अमित साळुंके, मकरंद घाडी, योगेश मडगावकर, लक्ष्मण म्हामल, कुदंन पटेकर, महिला काॅन्स्टेबल वेलसिया फर्नांडिस व इतर पथकाने मोरजी येथील खिंड गार्डन परिसरात रात्री ९.३० ते उत्तरात्री १.३० दरम्यान सापळा रचून संशयिताला अटक केली.
दरम्यान, या प्रकरणी तपासपूर्ण करून एएनसीने संशयित सर्गेई रोझनोव्ह याच्या विरोधात ११ जून २०२४ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. याच दरम्यान संशयिताने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. दरम्यान संशयित कोलवाळ तुरुंगात असताना त्याच्याकडून ड्रग्स जप्त केले आहे. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित सर्गेई रोझनोव्हयाचा जामीन फेटाळून लावला.
संशयिताकडून पावणेदोन कोटीचा गांजा जप्त
मोरजी येथे अटक केलेल्या रशियन नागरिक सर्गेई रोझनोव्ह या संशयिताची झडती घेतली असता, त्याच्याकडून १ कोटी ७५ हजार रुपये किमतीचा २ किलो उच्च दर्जाचा गांजा, १.२ किलो चरस आणि १५ ग्रॅम एलएसडी लिक्विड ड्रग्ज जप्त केले. या प्रकरणी तत्कालीन उपनिरीक्षक प्रवीण सिमेपुरुषकर यांनी संशयिताच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या कलम २०(बी) ii (बी), २० (बी)(ii)सी आणि २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.