गोव्यासह अनेक राज्यांतील नामांकित हॉटेल्सच्या नावे चालवली जात होती बनावट वेबसाईट्स
पणजी : गोवा, ओडिशा, मेघालय येथील नामांकित रिसॉर्ट्स, हॉटेल्सच्या बनावट वेबसाईट तयार करून पर्यटकांना गंडा घातल्या प्रकरणी गोवा पोलिसांनी ललित खरे (वय २५, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. या आरोपीने गोव्यातील ४ , ओडिशातील २ आणि मेघालय येथील एका हॉटेलच्या बनावट वेबसाईट बनवल्या होत्या. याद्वारे त्याने बनावट बुकिंग करून त्याचे पैसे देखील घेतले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सासष्टी येथील एका नामांकित बीच रिसॉर्टच्या मेनेजरने याबाबत तक्रार दिली होती. यानुसार अज्ञातांनी त्यांच्या रिसॉर्ट्सची बनावट वेबसाइट, ब्रँड नाव तयार केले. यानंतर त्यांनी ग्राहकांना या बनावट वेबसाइटवरून स्वतःच्या बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगितले. तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत या बनावट वेबसाईट चालवणाऱ्या आरोपीचा माग काढला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांनी त्याला अटक केली.
चौकशदरम्यान आरोपीने सात बनावट वेबसाईट तयार केल्याचे कबूल केले. मध्य प्रदेश येथीलच फिरोझ अहमद याने आरोपीला बनावट वेबसाईट तयार करण्यासाठी पैसे दिल्याचे उघड झाले. याप्रकरणी फिरोजला देखील नोटीस बजावण्यात आली . फिरोजच्या चौकशीतून हाती आलेल्या माहितीनुसार सध्या मेवात, राजस्थान येथे पुढील चौकशी सुरु आहे. आरोपी ललितने बनावट वेबसाईटवर त्या हॉटेल , रिसॉर्टचे नाव आणि फोटो लावले होते.
अशा पद्धतीने व्यवहार केले जात होते.
बुकिंगच्या उद्देशाने जेव्हा कोणी गुगलवर विशिष्ट हॉटेल शोधते तेव्हा ते बनावट वेबसाईटवर डायरेक्ट केले जात होते. या बनावट वेबसाईटवर एक व्हाट्सॲप नंबर देण्यात आला होता. यावर गंडा घालणारे आपण हॉटेल कर्मचारी असल्याचे भासवून चॅट करत . यानंतर ते बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यास प्रवृत्त करत. यासाठी हॉटेल्सचे ऑनलाइन बुकिंग करताना सावध राहणे, विशिष्ट हॉटेलच्या अनेक वेबसाइट्स आहेत का ते तपासणे, पैसे ट्रान्स्फर करण्यापूर्वी खातेदाराचे नाव तपासणे आवश्यक असल्याचे सायबर गुन्हे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.