आगीत दोन स्कूटर व एक मोटरसायकल जळाली.
म्हापसा : एकतानगर म्हापसा येथे रागाच्या एकाने भरात आपल्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या दुचाकीला आग लावली. दरम्यान ही आग फोफावल्याने तीन दुचाकींना झळ बसली. त्यातील दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित आरोपी तमसिम शेख (३३, डांगी कॉलनी म्हापसा) याला अटक केली आहे.
सदर घटना शनिवारी २२ रोजी पहाटे ३.४५च्या सुमारास घडली. एकतानगर येथे साईबाबाच्या मंदिराजवळ पार्क केलेल्या फॅसिनो स्कूटर व अन्य एक मोटरसायकल पूर्णपणे आगीत जळून खाक झाल्या. तर एक्टिवा दुचाकीचे देखील काहीप्रमाणात नुकसान झाले. संशयित तमसिम शेख याने रागाच्या भरात ही आग लावल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. या आगीची झळ बाजूला पार्क इतर गाड्यांना लागल्याने एकूण तीन दुचाकी जळाल्या.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयिताला पकडून अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.