गुन्हेवार्ता : दिल्लीच्या पर्यटकांची दादागिरी ! स्थानिक महिलेच्या अंगावर घातली गाडी

पोलिसांनी कायदेशीर सोपस्कार पार पाडत अपघातास कारणीभूत व्यक्तीला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
22nd February, 02:41 pm
गुन्हेवार्ता : दिल्लीच्या पर्यटकांची दादागिरी ! स्थानिक महिलेच्या अंगावर घातली गाडी

पणजी : राज्यात पर्यटक आणि स्थानिक यांच्यात संघर्ष वाढत चालला आहे. काल शुक्रवारी रात्री उशिरा ११ वाजता, जुनसवाडा-मांद्रे येथे एक थरारक घटना घडली. येथे  मारियाफेलिझ फर्नांडिस व तिच्या मुलाने पाळीव कुत्र्यांमुळे उद्भवणारा गोंधळ टाळण्यासाठी जुनसवाडा येथे कुत्रा घेऊन येऊ नका अशी विनंती केली. याचे पर्यवसान वादात झाले.

वादानंतर, एका कारने स्थानिक महिला मारियाफेलिझ फर्नांडिस हिला जोरदार धडक दिल्यानंतर तीला काही अंतर फरफटत नेले. चाकाखाली आल्याने तिच्या मृत्यू झाला. यानंतर कारचालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत घटनास्थळावरून पोबारा केला. ज्या ठिकाणी ही घटना घडली येथे खूपच अशिर असा रस्ता आहे.  दीपन बत्रा या कार चालकाने रागाच्या भरात हे कृत्य केले असावे असा स्थानिकांना संशय आहे.  

  • नेमके काय घडले ? 

स्थानिक पंच रॉबर्ट फर्नांडिस यांनी  गोवन वार्ताच्या प्रतिनिधीला दिलेल्या माहितीनुसार,  मारियाफेलिझ या जुनसवाडा येथे आपल्या घराजीक शहाळीविक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान गेले अनेक काही दिवस येथे मुळ दिल्ली येथील कुटुंबातील काही सदस्य रात्री पाय मोकळे करण्यासाठी येतात.  त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा देखील असतो. बऱ्याचदा या कुटुंबियांचा कुत्रा आणि मारियाफेलिझ यांचे दोन कुत्रे यांचे नेहमीच भांडण जुंपते. नेहमीचीच कटकट नको म्हणून मारियाफेलिझ व त्यांचा मुलगा जोसएफ यांनी या कुटुंबीयांना आपल्या कुत्राला आवर घालण्यास सांगितले.

 दरम्यान काही  गैरसमज झाल्याने पर्यटक कुटुंबातील एका महिलेने मारियाफेलिझ यांच्या केसांना पकडून त्यांना खाली पाडले.  जोसेफ आपल्या आईला आधार देण्यासाठी धावत आला. त्याचा खांदा दुखापत ग्रस्त असल्याने आईला मदत करता आली नाही. दरम्यान येथेच असलेल्या अन्य एकाने तीला उठवून खुर्चीवर बसवले. काही वेळ वादावादी झाल्यानंतर  दिल्लीचे पर्यटक आपल्या कुत्र्याला घेऊन किनाऱ्याच्या दिशेने गेले. थोड्यावेळात त्याच रस्त्याने दीपन बत्रा हा तरुण भरधाव वेगाने निघाला. जाताना त्याने खुर्चीवर बसलेल्या फर्नांडिस यांना जोरदार धडक दिली. सुमारे दहा मीटर अंतरावर तीला फरफटत नेले. गाडीचे चाक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना एका सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर चालकाने पोलिसांत आत्मसमर्पण केले. 

दरम्यान काल रात्री उशिरा घडलेल्या या प्रकाराने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. स्थानिक आज पहाटे ४-५ वाजेपर्यंत मांद्रे पोलीस स्थानकाबाहेर ठाण मांडून होते. दरम्यान आता हाती आलेल्या माहितीनुसार, मांन्द्रे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत दीपन राजू बत्रा यांच्यावर  भा न्यां संच्या कलम १०३ तसेच २८१ अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली. पुढील तपास मांद्रे पोलीस निरीक्षक शेरीफ जॅकीस करत आहे.

या प्रसंगामुळे येथील नागरिक उद्विग्न झाले असून त्याने कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे. स्थानिक आणि पर्यटक यांच्या मधील वाढत्या संघर्षामुळे गोव्याचा किनारपट्टी भाग बऱ्याच काळापासून बदनाम होत आहे. गेल्या एक-दीड वर्षांच्या कालावधीत स्थानिक आणि पर्यटकांत वादाची ठिणगी पडून त्याचे पर्यवसान हे मारहाण आणि प्रसंगी खुनात देखील झाले आहे. बऱ्याचदा अशा घटना रागाच्या भरात घडल्या आहेत. 

हेही वाचा