आरोग्यमंत्री : मये येथील मेगा आरोग्य शिबिराला प्रतिसाद
मये येथील मेगा आरोग्य शिबिराचे उद्घाटन करताना आरोग्यमंत्री विश्वाजीत राणे. सोबत आमदार प्रेमेंद्र शेट व इतर.
...
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : आरोग्य क्षेत्रात राज्याने देदीप्यमान कामगिरी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात आरोग्य क्षेत्रात आधुनिक सुविधा व नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे. सामान्य माणसाला आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेसाठी सवलतीच्या दरात ‘केअर टेकर’ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना आखण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने मये येथील पंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेगा आरोग्य शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, गोवा दंत महाविद्यालयाच्या डीन आयडा नोरोन्हा, आरोग्य संचालिका डॉ. रूपा नाईक, मये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. ऊर्मिला गावस व्यासपीठावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाला सरपंच, पंच व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य शिबिराचा लाभ शेकडो लोकांनी घेतला. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे व आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कॅन्सरसारखे आजार सर्वसामान्य लोकांना आर्थिकदृष्ट्या उद् ध्वस्त करत आहेत. कॅन्सरपीडित रुग्णांना उत्तम दर्जाची आधुनिक सुविधा उपलब्ध व्हावी व अल्प दरात आरोग्य सेवा देण्याचा सरकारने प्रयत्न केला आहे. प्रत्येक मतदारसंघात मेगा शिबिरांचे आयोजन करून आरोग्यविषयक जागृती करणे, कॅन्सरबाबत जागृती करणे हा आमचा हेतू आहे. आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळ निर्मितीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत आपण साखळी वा पर्ये येथे महाविद्यालय उभारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून शेकडो लोकांना रोजगाराच्या संधीही प्राप्त होणार आहेत. मी मये मतदारसंघाचा मतदार असल्यामुळे या भागातील लोकांबद्दल आपुलकी आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यावेळी म्हणाले.
आरोग्य केंद्राचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न : प्रेमेंद्र शेट
मये मतदारसंघातील ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नरत आहोत. मये, पिळगाव व कारापूर सर्वण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तर उंचावण्यासाठी, तसेच आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण विनंती केली होती. त्याला मान देऊन आरोग्यमंत्र्यांनी आमची मागणी पूर्ण होण्यासाठी आवश्यक गोष्टींना मंजुरी दिली आहे, असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.