सकाळी दव, दुपारी उष्मा : तापमान वाढत असल्याने काळजी घेण्याचा डॉक्टरांकडून सल्ला
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात होत असलेल्या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होत आहे. सातत्याने वाढत असलेले तापमान आणि सकाळच्या सत्रातील दवाचा परिणाम आरोग्यावर होत असल्यामुळे ताप, थंडी, सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे.
राज्यातील कमाल तापमान सरासरी ३४, तर किमान तापमान २३ अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत राहत आहे. काही दिवसांपासून कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे दुपारच्या सत्रात स्थानिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या वेळेला पडणारे दव आणि त्यानंतर दिवसभर कायम राहणारा उष्मा यांचा परिणाम आरोग्यावर होत असल्यामुळे गेल्या काही दिवसांत राज्यभर ताप, थंडी, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. उपचारांसाठी सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र सर्वच ठिकाणी दिसून येत आहे.
डिचोली, सत्तरीत पावसाच्या सरी
राज्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत असतानाच रविवारी सत्तरी आणि डिचोली तालुक्यांतील काही भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. पुढील काही दिवस इतर भागांतही पावसाचा शिडकावा होण्याचा अंदाज राज्य हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संसर्गजन्य आजारांचे तज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर म्हणतात...
गेल्या काही वर्षांत फेब्रुवारी ते मेपर्यंतच्या काळात राज्यातील तापमानात सातत्याने वाढ होत आहे. मार्च, एप्रिलमध्ये उष्णतेची लाट येण्याचा धोकाही निर्माण होत आहे.
यंदाही आतापासूनच तापमानात वाढ होत असून, पुढील किमान तीन महिने ही परिस्थिती अशीच राहील. वातावरणात होत असलेल्या बदलांमुळेच ताप, थंडी, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
पुढील तीन महिन्यांच्या काळात नागरिकांनी वाढत्या तापमानापासून स्वत:चा बचाव करणे आवश्यक आहे. दिवसभरात शरीराला आवश्यक तितके पाणी पिणे, आवश्यकता नसल्यास कडक उन्हात जाणे टाळणे गरजेचे आहे.