केरळमधील कोकणी भाषिकांनी जपली संस्कृती

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ; केरळमधील कोकणी भाषिकांशी साधला संवाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
केरळमधील कोकणी भाषिकांनी जपली संस्कृती

कोकणी भाषिकांशी संवाद साधताना मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत.

पणजी : केरळ येथील कोकणी भाषिकांनी कोकणी संस्कृती जपली आहे आणि कोकणी भाषेत साहित्यही निर्माण केले आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंंत यांंनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केरळमधील विविध शहरांना भेट दिली आणि कोकणी भाषिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कोकणी भाषेसाठी केलेल्या कामाबद्दल त्यांनी पद्मश्री विजेते नारायण पुरुषोत्तम मल्ल्या यांची भेट घेतली. मंदिरांना भेट देण्याबरोबरच, त्यांनी सेवाभावी संस्थांनाही भेटी दिल्या.कोकणी लेखक नारायण पुरुषोत्तम मल्ल्या यांनी कोकणी भाषेत मोठे योगदान दिले आहे. कोकणी भाषेत अनेक पुस्तके लिहिणारे नारायण मल्ल्या यांना २००५ चा कोकणी भाषा प्रचार सभेचा पितामह पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

कोची येथे मुख्यमंत्र्यांनी अप्पू भट्ट, विनायक पंडित आणि रंगा भट्ट यांच्या स्मारकांना भेट दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. १७ व्या शतकात, तिन्ही शास्त्रज्ञांनी ७०० प्राण्यांची चित्रे काढली होती. या तिघांनी देवनागरी कोकणीमध्ये संशोधन केले आहे.एर्नाकुलम येथील अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित केला होता. मुख्यमंत्र्यांनी कोकणी भाषिकांशी संवाद साधला व सर्वांचे कौतुक केले.तिरुमला देवस्वोम गोशीपुरम मंदिर हे कोची येथील गौड सरस्वती ब्राह्मण समुदायाचे एक मंदिर आहे. मुख्यमंत्र्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.एर्नाकुलममध्ये, अनुग्रह चॅरिटेबल ट्रस्ट महिलांसाठी आश्रयस्थान चालवण्यासह अनेक सामाजिक कार्य करते. मुख्यमंत्र्यांनी ट्रस्टला भेट दिली आणि त्यांच्या कामाबद्दल चौकशी केली. 

मुख्यमंत्र्यांनी कोकणी भाषिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात कार्यक्रम ऐकला. त्यांनी एर्नाकुलममधील तिरुमला मंदिराला भेट दिली. १७ व्या शतकात, गोव्यातून बरेच लोक केरळमध्ये स्थलांतरित झाले. कोची आणि एर्नाकुलममध्ये बरेच कोकणी भाषिक आहेत. 


हेही वाचा