ग्रामसभेचा निर्णय डावलून मेगा प्रकल्पांना परवानगी नको

कोरगाव ग्रामसभा : ग्रामस्थ आक्रमक; पंचायत मंडळ धारेवर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
ग्रामसभेचा निर्णय डावलून मेगा प्रकल्पांना परवानगी नको

कोरगाव ग्रामसभेत बोलताना सरपंच अब्दुल करीम नाईक सोबत उपसरपंच दिवाकर जाधव.

पेडणे : कोरगाव ग्रामपंचायत ग्रामसभा गदारोळात झाली. या सभेत कोरगाव पंचायत मंडळांनी ग्रामसभेचा निर्णय डावलून मेगा प्रकल्पांना दिलेले ना हरकत दाखले त्वरित मागे घ्यावेत. तसेच यापुढे ग्रामसभेत एखादा मेगा प्रकल्प तसेच अन्य मोठे प्रकल्प कोरगाव गावात होत असल्यास त्याची पूर्वकल्पना ग्रामसभेत देऊनच त्यानंतरच त्याला परवानगी देण्यात यावी, असा एकमुखी ठराव घेण्यात आला. त्याला सर्वानुमते मान्यता देण्यात आली. 
कोरगाव ग्रामसभेत यापूर्वी मेगा प्रकल्पांना ना हरकत दाखले देण्यास सक्त विरोध केला होता. एखादा दाखला देताना ग्रामसभेची मान्यता घ्यावी. गावाच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रकल्पाला परवानगी देताना साधक बाधक विचार व्हावा. तसेच पर्यावरण, पाणी, वीज, रस्ते याचाही विचार करून अशा मेगा प्रकल्पांना परवानगी द्यावी. स्थानिक नागरिकांना कुठल्याही प्रकारे अशा प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता पंचायत मंडळांनी घेणे गरजेचे आहे. मात्र पंचायत मंडळ स्वतःच्या फायद्यासाठी आणि पैशाच्या लोभापोटी अशा प्रकल्पांना परवानगी देत असल्याचा आरोप यावेळी नागरिक नरेश कोरगावकर तसेच अन्य ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला.
यापूर्वी झालेल्या ग्रामसभेत ठरावही संमत झाला होता. मात्र देवसू येथील तसेच माईण कोरगाव येथील मेगा प्रकल्प, बांधकामासाठी ग्रामसभेत ठराव घेऊन त्या ठरावाला बगल देण्याचे काम पंचायत मंडळाने केल्याने ग्रामस्थ आक्रमक बनले व पंचायत मंडळाला धारेवर धरले. सरपंच अब्दुल करीम नाईक यांनी वेळोवेळी ग्रामसभेला ना हरकत दाखल्याबाबत आपली बाजू पटवून देण्याचे प्रयत्न केला. मात्र नागरिक आक्रमक झाल्याने ग्रामसभेत बराच गदारोळ झाला.
सचिवांची बदली करण्याची मागणी
पंचायत सचिव यांनी ठराव ग्रामसभेत संमत झाल्यानंतर कशी काय परवानगी दिली. असाही प्रश्न ग्रामस्थ नरेश कोरगावकर यांनी ग्रामसभेत उपस्थित करून सचिव मनमानी कारभार करत आहेत. त्या कुणाला जुमानत नाही. यासाठी त्यांची इतरत्र बदली करावी, अशी जोरदार मागणी ग्रामसभेत केली.
कोरगाव पंचायतीचे ग्रामसभा सरपंच अब्दुल करीम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. २३ रोजी श्री कमलेश्वर पंचायत सभागृहात पार पडली. यावेळी उपसरपंच दिवाकर जाधव, पंच सदस्य तथा माजी सरपंच अनुराधा कोरगावकर, पंच सदस्य नीता नरसे, पंच सदस्य कल्पिता कलशंकर, पंच सदस्य देविदास नागवेकर, पंच सदस्य उमेश च्यारी, पंच सदस्य लौकक शेट्ये, पंचायत सचिव श्रद्धा कोरगावकर, गट विकास कार्यालयाचे निरीक्षक तिळवे आदी उपस्थित होते.
विविध विषयावर झालेल्या चर्चेत नरेश कोरगावकर, माजी सरपंच सुदीप कोरगावकर, राहुल भगत, प्रकाश तळवणेकर, महादेव गवंडी, लक्ष्मण गावडे, देवानंद गावडे, सोनू गावडे, अॅड. जगदीश तोरस्कर, माजी सरपंच राजीव नर्से, माजी सरपंच डॉमिनिंग फर्नांडिस, जाधव, अल्फान फर्नांडिस, विनिता मांद्रेकर, नामदेव गावडे आदी ग्रामस्थांनी चर्चेत भाग घेऊन विविध सूचना केल्या.