मुख्यमंत्र्यांना जिवंत गाडू म्हणणाऱ्या रामा काणकोणकर यांची अटकेनंतर सुटका

विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकारवर निशाणा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd February, 08:16 pm
मुख्यमंत्र्यांना जिवंत गाडू म्हणणाऱ्या रामा काणकोणकर यांची अटकेनंतर सुटका

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जिवंत गाडू, अशी धमकी देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना पणजी पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. त्यानंतर न्यायालयाकडून काणकोणकर यांची शनिवारी जामिनावर सुटकाही करण्यात आली. परंतु, काणकोणकर यांच्या अटकेवरून विरोधी पक्षांसह इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली.

चार दिवसांपूर्वी पणजीत पत्रकारांशी बोलत असताना, परप्रांतीय गोव्यात येऊन गोमंतकीयांना धमक्या देत असतानाही गृह खात्याकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे म्हणत, रामा काणकोणकर यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना धमकी देणारे वक्तव्य केले होते. याबाबतचा व्हिडिओ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी काणकोणकर यांना चौकशीसाठी बोलावले होते. परंतु, ते चौकशीला न आल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. काणकोणकर यांना शनिवारी पणजीतील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले असता, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली होती. परंतु, रात्री त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.


दरम्यान, काणकोणकर यांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांनी शनिवारी सकाळी पणजी पोलीस स्थानक गाठून काणकोणकर यांच्या अटकेचा निषेध केला. यावेळी काणकोणकर यांच्या आई-वडिलांना अश्रू अनावर झालेले होते. काहीही चूक नसताना सरकारने आपल्या मुलावर जाणीवपूर्वक अटकेची कारवाई केल्याचा आरोप काणकोणकर यांच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना केला.

काणकोणकर यांची तत्काळ सुटका करा : काँग्रेस

प्रदेश काँग्रेसने रामा काणकोणकर यांच्या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. राज्यातील भाजप सरकार सत्तेचा गैरवापर करीत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचे तोंड बंद करण्याचे प्रयत्न सरकारकडून सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून अन्यायाविरोधात लढणाऱ्या रामा काणकोणकर यांना अटक करण्यात आल्याचा दावा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. रामा काणकोणकर यांनी असा कोणता गुन्हा केला आहे की त्यांना तोंड झाकून गुन्हेगारासारखे वागवले जात आहे, असा सवाल त्यांनी केला. काणकोणकर यांची तत्काळ सुटका न झाल्यास काँग्रेस गप्प बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

एसटी समाजाने काणकोणकरांच्या पाठिशी राहावे!

राज्यातील अनुसूचित जमातींवर (एसटी) होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम रामा काणकोणकर गेल्या काही वर्षांपासून करीत आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर वि​विध आरोप ठेवून सरकार त्यांना अडकवू पाहत आहे. अशावेळी एसटी समाज​ बांधवांनी काणकोणकर यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे, असे आपचे राज्य निमंत्रक अमित पालेकर यांनी नमूद केले.

अघोषित आणीबाणी लागू केली आहे का? : विजय

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनीही काणकोणकर यांच्या अटकेवरून सरकारवर निशाणा साधला. सरकारविरोधात कुणी काही बोलले की त्याला थेट तुरुंंगात टाकले जाते. सरकारने राज्यात अघोषित आणीबाणी लागू केली आहे का, असा सवाल त्यांनी केला. रामा काणकोणकर एसटी समाजासाठी लढत आहेत. त्यामुळे सर्वांनीच त्यांना साथ देणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गिरीराज पै वेर्णेकर यांची सामाजिक कार्यकर्त्यांवर टीका

सरकारविरोधात बोलले की स्वत: केलेल्या चुकांतून सुटका होते, असे राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळेच ते सरकारवर नाहक आरोप करतात. मुख्यमंत्र्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देतात आणि त्यावरून कारवाई झाली की सूड उगवल्याचा दावा करतात. पण, राजकारण आणि समाजकारण चुकीच्या गोष्टींना थारा देण्यासाठीची विमा पॉलिसी असू शकत नाही, असे म्हणत भाजप प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर यांनी रामा काणकोणकर यांच्यावर टीका केली.