म्हापसा : साळगाव येथे पोलिसांनी ड्रग्स विरोधी कारवाईखाली छापा टाकून अडीच लाख रुपयांचा सुमारे २.५ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी संशयित आरोपी राजाराम सीताराम बनवासी (३६, रा. दिंडोरी मध्यप्रदेश) याला अटक केली.
शनिवार दि. २२ रोजी पहाटेच्या सुमारास साळगाव पोलिसांनी साळगाव येथील दफनभूमीजवळ ही कारवाई केली. येथे ड्रग्स विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला व घटनास्थळी संशयित येताच त्याला ताब्यात घेतले.
झडतीवेळी संशयित बनवासी याच्याकडे २.५३३ किलो ग्रॅम गांजा सापडला. या गांजाची किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. हा ड्रग्स जप्त करून पोलिसांनी संशयित आरोपीला अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक केली. पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक दिशन नाईक व अक्षय गावकर यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी ही कामगिरी केली.