पोलिसांच्या तपासातील फोलपणावर बोट ठेवत उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आदेश
पणजी : २०११ मध्ये जप्त केलेला ड्रग्सचा अहवाल सकारात्मक येऊनही तपास अधिकाऱ्याची न्यायालयात उलटतपासणी झाली नाही. असे निरीक्षण नोंदवून १४ वर्षानंतर अॅलन बेनब्रिज या ब्रिटीश नागरिकाला न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. याबाबतचा आदेश म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी दिला आहे.
या प्रकरणी हणजूण पोलिसांनी ११ जुलै २०११ रोजी गुन्हा दाखल केला. त्यानुसार, निवृत्त पोलीस उपअधीक्षक सॅमी तावारीस याच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण गावस यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक रामचंद्र शिंदे, हवालदार यशवंत डावरे, काँन्स्टेबल विवेक एकावडे, केशव नाईक व इतर पथकाने गुप्तहेरांच्या माहितीवरून ११ जुलै २०११ रोजी सायंकाळी १८.४५ ते २०.३० दरम्यान, वोनाचे भाट येथील हणजूण पंचायत घराजवळ छापा टाकला. त्यावेळी पथकाने अॅलन बेनब्रिज या ब्रिटीश नागरिकाची चौकशी केली असता, त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचा ५५५ ग्रॅम चरस जप्त केला.
त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम २२ (बी)(ii)(बी)अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर न्यायालयाने २६ जुलै २०११ रोजी न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी १३ डिसेंबर २०१३ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ३० एप्रिल २०१५ रोजी आरोप निश्चित करून खटला सुरु केला. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, जप्त केलेला ड्रग्सचा अहवाल सकारात्मक आला होता. मात्र या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची उलटतपासणी झाली नाही. त्यामुळे छाप्यासंदर्भात शंका निर्माण होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. याची दखल घेऊन न्यायालयाने संशयित अॅलन बेनब्रिज या ब्रिटीश नागरिकाला निर्दोष सुटका केली आहे.