बेहिशेबी मालमत्ता खरेदीप्रकरणी माजी कस्टम आयुक्ताविरोधात आरोपपत्र

२.२० कोटींची बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्याचे समोर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd February, 07:37 am
बेहिशेबी मालमत्ता खरेदीप्रकरणी माजी कस्टम आयुक्ताविरोधात आरोपपत्र

पणजी : केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा विभागाने भारतीय महसूल सेवेचे (आयआरएस) अधिकारी तथा गोव्यातील तत्कालीन कस्टम आयुक्त राजगोपाल मनोहर याच्याविरोधात १.३९ कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. चौकशी दरम्यान त्याने २.२० कोटींची बेहिशेबी मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले. या प्रकरणी सीबीआयने मनोहर याच्यासह पत्नी विरोधात मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे ५००० पानी आणि ८९ साक्षीदारांची साक्ष नमूद करून आरोपपत्र दाखल केले आहे.

राजगोपाल मनोहर याने पुणे आणि गोव्यात १ जानेवारी २०११ ते २६ सप्टेंबर २०१९ मध्ये सेवा बजावली. सीबीआयने वरील कालावधीत त्याच्या आणि कुटुंबीयांच्या मालमत्तेचे लेखा अहवाल तपासले. त्यावेळी त्यांची १ कोटी ३९ लाख ३४ हजार ९०६ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला. या प्रकरणी सीबीआयचे गोवा विभागाचे तत्कालीन अतिरिक्त अधीक्षक सी. बी. रामादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सखाराम एस. परब यांनी २१ ऑगस्ट २०२० मध्ये त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी तत्कालीन उपअधीक्षक एन. परब यांनी तपास केला. त्यानंतर अतिरिक्त अधीक्षक टी. संतोष कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अपर्णा चोडणकर यांनी पुढील तपास करून राजगोपाल मनोहर आणि पत्नीने २ कोटी २० लाख ५४ हजार ५९२ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता केल्याचे समोर आणले. त्यानुसार, त्यांचे वरील कालावधीत वेतन ३ कोटी ३७ लाख ६४ हजार ७६४ रुपये होते. तर त्याच कालावधीत त्यांनी १ कोटी ५८ लाख ८२ हजार २३३ रुपयांची मालमत्ता खरेदी केली. तसेच त्या कालावधीत ३ कोटी ९९ लाख ३७ हजार १२३ रुपये खर्च केले होते. तर, वरील कालावधीपूर्वी मालमत्ता १५ लाख ९० हजार ३३५ रुपये होती. या कालावधी नंतर त्यांची मालमत्ता १ कोटी ७४ लाख ७२ हजार ५६८ रुपये होती. याशिवाय त्यांची बचत ६१ लाख ७२ हजार ३५९ रुपये होती.

त्यामुळे वरील कालावधीत राजगोपाल मनोहर आणि त्यांच्या पत्नीने २ कोटी २० लाख ५४ हजार ५९२ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा करून सीबीआयने मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

तामिळनाडू, आंध्रप्रदेशमध्ये कारवाई

सीबीआयने राजगोपाल मनोहर यांच्या मूळ गावी सालेम - तामिळनाडू आणि विशाखापट्टणम - आंध्रप्रदेश येथील घर आणि कार्यालयाची झडती घेतली. यावेळी सीबीआयने महत्त्वाचे दस्तावेज जप्त केले होते. 

हेही वाचा