- निष्काळजीपणाबद्दल ३ कर्मचारी निलंबित : आरोग्यमंत्र्यांनी घेतले डॉक्टर, कर्मचाऱ्यांना फैलावर
उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील रुग्णांशी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे. (नारायण पिसुर्लेकर)
- डॉक्टरांचा युनिफॉर्म किंवा कोट घालण्यास चालढकलपणा
- इस्पितळात रुग्ण असताना कर्मचारी गप्पांमध्ये दंग
- सीटी स्कॅनिंग मशीन ७ महिन्यांपासून बंद
- काही रुग्ण जमिनीवरच बसल्याचे निदर्शनास
पणजी : म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयातील अंदाधुंद कारभाराचा अनुभव आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना सोमवारी आला. त्यांनी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना धारेवर धरत तीन जणांना निलंबित केले. यावेळी मंत्री राणे यांनी कामात दुुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला.
यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मी स्वतः भेट घेतली असून त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर उत्तर गोवा रुग्णालयातून तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाबाबत रुग्णांसह इतरांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. रुग्णवाहिका चालक तसेच इतर कर्मचाऱ्यांकडून तेथील प्रमुख आणि डॉक्टरांच्या आदेशांचे पालन केले जात नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनीही जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सोमवारी रुग्णालयाला आकस्मिक भेट देऊन त्यांनी पाहणी केली.
रुग्णवाहिका चालक कामाबाबत निष्काळजीपणा करतात. गंभीर आजारी रुग्णांवर लवकरात लवकर उपचार व्हावेत यासाठी चालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मात्र, रुग्णवाहिका चालक अनावश्यक वेळ घालवत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तीन चालकांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले. यशवंत गावठणकर, सुबोध नाईक आणि गुरुदास पेडणेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. रुग्णवाहिका चालक जाणूनबुजून रुग्णवाहिका उभ्या करतात. तसेच पुन्हा पुन्हा रजेवर जातात. त्यामुळे रुग्णवाहिका सेवेवर परिणाम होतो.
काही डॉक्टर हॉस्पिटलचा कोट न घालताच हॉस्पिटलमध्ये येतात. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांनी कोट किंवा गणवेश न घातल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. रुग्णांची ईसीजी घेणारे दोघे कर्मचारी सोबत रुग्ण असताना अन्य विषयावर बोलताना आढळले. या कर्मचाऱ्यांपैकी एकजण वाळपई मतदारसंघातील होता. सदर कर्मचाऱ्यांनाही यावेळी त्यांनी तंबी दिली. वाळपई किंवा सत्तरीतील कर्मचारी जरी कामाकडे दुर्लक्ष करत असेल तरी त्यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेल्या आरोपींची गंभीर रुग्णांपूर्वी तपासणी केली जाते. हा प्रकार यापुढे बंद केला जाईल. प्रथम गंभीर आजारी असलेल्या रुग्णांची तपासणी करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या सूचना
१. रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन गेल्या ७ महिन्यांपासून बंद आहे. सदर मशीनची पाहणी करून लवकरच दुसरे मशीन उपलब्ध केले जाईल. तसेच रुग्णांना चांगल्या बेडशीट दिल्या जात नाहीत. त्यासाठी सल्लागारांनी रुग्णालयाला भेट देऊन सुविधांची पाहणी करावी.
२. जिल्हा रुग्णालयातून काही खासगी रुग्णवाहिकांचाही वापर केला जातो. याबद्दलही तक्रारी आल्या असून अशा रुग्णवाहिकांवर कारवाई केली जाईल.
३. रुग्णालयाची देखभाल योग्य प्रकारे केली जात नाही. त्यामुळे यापुढे रुग्णालयाच्या देखभालीची जबाबदारी जीएसआयडीसीकडे सोपवली जाईल.
कॅन्सर रुग्णांची होणार फाऊंडेशन १ चाचणी
- चाचणी घेणारे गोवा ठरणार देशातील पहिले राज्य
पणजी : कॅन्सरची स्टेज तसेच रुग्णाची एकूण तीव्रता निश्चित करण्यासाठी आता फाउंडेशन १ चाचणी गोव्यात देखील सुरू केली जाणार आहे. सदर चाचणी घेणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
आरोग्यमंत्री राणे यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कॅन्सर रुग्णालयाचे काम राज्यात जोरात सुरू आहे. डॉक्टर कॅन्सरची चाचणी केल्यानंतर याबाबतची शिफारस करतील. रुग्णाच्या शरीराचा एखादा भाग काढून (बायोप्सी) रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठवला जाईल. दरम्यान, यासाठी मुंबईतील एका कंपनीसोबत करार केला जाणार आहे. या एका चाचणीसाठी २ ते ३ लाख रुपये खर्च येतो. सदर चाचणी सीएसआर अंतर्गत सुरू करण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले.
कॅन्सरच्या रुग्णालयासाठी प्रोटोन थेरपी मशीनसह १२०० कोटी रुपयांची मशीन आणण्याचा प्रस्ताव आहे. सर्वसामान्य माणसाला कॅन्सरच्या चाचण्या आणि उपचार परवडणारे नाहीत. यामुळे सरकारकडून सवलतीच्या दरात उपचारांसह इतर सेवा उपलब्ध केल्या जातील, असे आरोग्यमंत्री म्हणाले.
आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणार
आरोग्यमंत्री म्हणाले, प्रत्येक मतदारसंघात फिरते आरोग्य सुविधा केंद्र (मोबाईल हेल्थ केअर युनिट) स्थापन करण्याचाही प्रस्ताव आहे. गोवा मेडिकल कॉलेजसह सरकारी रुग्णालयांमधील सुविधांचे ऑडिट केले जाईल. रुग्णालयांमध्ये रुग्णवाहिकांची कमतरता आहे. नवीन रुग्णवाहिका खरेदीसह आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारला जाईल.