पणजी बाजारात मानकुराद ६ हजार रुपये डझन

निवडक विक्रेत्यांकडेच उपलब्ध : हापूस ३ हजार रुपये डझन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
पणजी बाजारात मानकुराद ६ हजार रुपये डझन

पणजी : येथील बाजारात मानकुराद आंबा दाखल झाला आहे. सध्या काही निवडक विक्रेत्यांकडेच मानकुराद उपलब्ध आहे. बाजारात ६ हजार रुपयांना एक डझन या दराने मानकुराद आंब्याची विक्री सुरू आहे. याशिवाय हापूस आंबा अडीच ते ३ हजार रुपये डझन दराने विकले जात आहेत. लालबाग आंबा २०० रुपये किलो, तोतापुरी आंबे २०० रुपये, सिंदुरी आंबे २५० रुपये किलो दराने विकले जात आहेत.
सुरुवातीचे पीक असल्याने मानकुराद आंब्याला मागणी मोठी असते. पण, आवक कमी असल्याने मानकुरादच्या दरात प्रचंड वाढ होत असते. मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मानकुरादचे दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात, असे पणजी मार्केटमधील फळ विक्रेत्यांनी सांगितले.
बाजारात लहान आकाराच्या कैऱ्या १०० रुपयाला १० ते १२ नग आहेत. तर मध्यम आकारच्या कैऱ्या १०० रुपयाला ५ या दराने विकल्या जात होत्या. गत आठवड्याच्या तुलनेत इतर भाज्यांचे दर स्थिर होते.
सोमवारी पणजी बाजारात लसणाचे दर कमी होऊन २८० रुपये किलो झाले. मध्यम आकाराचा नारळ ४० रुपये, तर मोठा नारळ ५० रुपयाला नग होता. कांदे ५० रु., बटाटा ४० रु. तर टोमॅटो ३० रुपये किलो होते.
मिरचीचे दर कमी होऊन ८० रुपये किलो झाले. बाजारात काकडीचे दर ५० रुपये किलो होते. गाजर ६० ते ८० रुपये किलो होते. मटारचे दर ८० रुपये किलो होते. कोबीच्या एक गड्डा ३५ रुपये, तर फ्लॉवरचे दर ४० रुपये होते. दुधी भोपळ्याचे दर ३० रुपये किलो होता. लहान वांगी ६० रु. मोठी वांगी ८० रुपये किलो होती. दोडका आणि गवार प्रत्येकी ६० रुपये किलो होता. भेंडी, कारले, ढब्बू मिरची प्रत्येकी ८० रुपये किलो होते. वालपापडी ८० रुपये किलो होती. लिंबू ५ रुपयाला एक नग या दराने विकले जात होते. शेवग्याच्या शेंगा १६० रुपये किलो होत्या. मेथी २० रु., शेपू १५ रु., पालक १० रु., कांदा पात १० रु., तर तांबडी भाजी १० रु., कोथिंबीर १५ रुपये होती.
फलोत्पादनच्या भाज्यांचे दर
भाजी दर
भेंडी  : ३८ रु.
कोबी :  १६ रु.
फ्लॉवर  : २२ रु. नग
गाजर  : २९ रु.
वालपापडी  : ४८ रु.
मिरची  : ५४ रु.‍
कांदा  : ३९ रु.‍‍‍
बटाटा  : २९ रु.
टोमॅटो  : २१ रु.