पणजीचा पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर

फेब्रुवारीतील पाचव्या सर्वाधिक तापमानाची नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
पणजीचा पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर

पणजी : पणजीत सोमवारी कमाल तापमान वाढून ३७.४ अंश सेल्सिअस झाले होते. हे गेल्या ५५ वर्षांतील फेब्रुवारी महिन्यातील पाचवे सर्वाधिक तापमान होते. याआधी २१ फेब्रुवारी २००९ मध्ये पणजीत सर्वाधिक ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. तर २९ फेब्रुवारी १९८४ मध्ये ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. सोमवारी मुरगाव येथील कमाल तापमान ३३.४ अंश सेल्सिअस राहीले.
गेले काही दिवस राज्यातील तापमान वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात मे महिन्याप्रमाणे उष्णता जाणवत आहे. सोमवारी राज्यातील बहुतेक ठिकाणी सकाळी ११ पासूनच उन्हाचा कडाका जाणवत होता. दुपारनंतर घराबाहेर पडणे नकोसे झाले होते. हवामान खात्याच्या स्वयंचलित केंद्राच्या नोंदीनुसार साळगाव येथे ३९.४ अंश, पेडणे येथे ३८.६ अंश, तर मोपा येथे ३९ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. साळगाव येथे २२.१ अंश, म्हापसा येथे २२.३ अंश, तर मोपा येथे २२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली.
सोमवारी पणजीत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहिले. मुरगाव येथील किमान तापमान २३.५ अंश सेल्सिअस होते. खात्याने पुढील सहा दिवस राज्यातील किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कमाल आणि किमान तापमान अधिक असण्याची शक्यता असल्याने पुढील आठवडाभर नागरिकांना उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे. अशातच दमट हवामानामुळे उष्णतेममध्ये भर पडण्याची शक्यता आहे.
पारा ३७ अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता
हवामान खात्याने पुढील सात दिवस राज्यातील वातावरण कोरडे राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यादरम्यान कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे उष्णतेपासून वाचण्यासाठी काही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे.

फेब्रुवारीतील सर्वाधिक तापमान
तारीख / तापमान (अंश से.)
२१.२.२००९ : ३९.२
२९.२.१९८४ : ३८
१३.२.२०२३ : ३७.९
२०.२.१९९९ : ३७.७
९.२.२००१ : ३७.४
२४.२.२०२५ : ३७.४