पेडणेः मांद्रेतील नागरिकांचा पोलिस स्टेशनवर घेराव

गाडी पोलीस स्टेशनवरच अडवली : तपास कामात साथ देण्याचे पोलिसांचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
4 hours ago
पेडणेः मांद्रेतील नागरिकांचा पोलिस स्टेशनवर घेराव

पेडणे : जुनसवाडा मांद्रे येथील मारिया उर्फ मेरी फर्नांडिस या ७० वर्षीय महिलेल्या अंगावर गाडी घालून, तिला चिरडून ठार केलेला दिल्ली येथील संशयित दीपन राजू बत्राला मांद्रे पोलीस खासगी वाहनातून इतरत्र हलवत असल्याची माहिती मांद्रेवासीयांना मिळताच शेकडो ग्रामस्थांनी गाडीला घेराव घालून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटवर अडवली व ताबडतोब गाडी मागच्या मागे हटवण्यास भाग पाडले. 

सविस्तर माहितीनुसार जूनसवाडा येथील वयोवृद्ध महिला मारिया उर्फ मेरी फर्नांडिस हीच्या अंगावर दीपन बत्रा याने गाडी घालून तिला चिरडून ठार करण्याची घटना घडली होती. सदर संशयितावर गुन्हा नोंद आहे. 

दरम्यान या संशयिताला पोलीस व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा दावा मांंद्रेवासीयांनी करत आज मांद्रे पोलीस स्टेशनवर शेकडो ग्रामस्थांनी धडक दिली. मांद्रे पोलीस एका खासगी वाहनांमधून संशयिताला अन्यत्र नेण्याचा प्रयत्न करत होते. याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी गाडी अर्ध्यावर अडवली. 

त्यानंतर घटनास्थळी पोलीस निरीक्षक पोहोचल्यावर त्यांच्यासोबत अॅडव्होकेट प्रसाद शहापूरकर, सरपंच राजेश मांजरेकर, माजी सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक, पंच किरण सावंत, पंच रॉबर्ट फर्नांडिस आदींनी चर्चा करून, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत हे प्रकरण आम्ही मिटू देणार नसल्याचा इशारा दिला. 

तसेच जुनसवाडा येथे ग्रामस्थांची पंचायत मंडळाच्या उपस्थितीत एक बैठक होऊन जोपर्यंत मारिया फर्नांडिस यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा दिला. तसेच पोलिसही जर योग्य पद्धतीने तपास करत नसतील तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही दिला.

पीडितांना न्याय मिळवून देणार
मांद्रे पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले की, या प्रकरणाचा योग्य पद्धतीने आम्ही तपास करत असून योग्य प्रत्यक्षदर्शीची आवश्यकता आहे. 

त्यासाठी ग्रामस्थांनी मदत करावी. सर्व कायदेशीर बाबी तपासून आम्ही पीडितांना न्याय मिळवून देणार अशी ग्वाही पोलीस निरीक्षक शरीफ जॅकीस यांनी दिली.                        

हेही वाचा