एकाचे विकृत कृत्य. तरुणीने आपला धक्कादायक अनुभव सोशल मिडियावर कथन केल्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे.
पणजी : गोव्यात महिला सुरक्षित आहेत. देशातील इतर प्रदेशांपेक्षा तरी नक्कीच. आणि या गोष्टीला केंद्रीय गृह खात्याने जारी केलेल्या आकडेवारीचे पाठबळ आहे. मात्र आज एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेने सोशल मिडियावर देखील चर्चेला तोंड फोडले आहे. अनेकजण तोच प्रश्न विचारताहेत, गोव्यात महिला खरेच सुरक्षित आहेत का ?
पहा पोस्ट
नेमके प्रकरण काय ?
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या पोस्टमुळे सध्या विविध प्लॅटफॉर्म्सवर कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. या पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, एक महिला (पोस्ट करणारी) दुचाकीवरुन आपल्या मैत्रिणीसोबत जुन्या पाटो ब्रिजवरुन जात असताना एक दुचाकी चालक आपली गाडी त्यांच्या समांतर चालवू लागला. 'एक्सक्यूज मी' म्हणत त्याने चांगुलपणाचा आव आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी, तो एका हाताने गाडी चालवत होता दुसरीकडे विक्षिप्त कृत्य करत होता. त्याने तिच्यावर एक अश्लाघ्य कमेंट देखील पास केली. किळसवाणे कृत्य पाहून हादरलेल्या सदर महिला व तिच्या सोबत असलेल्या मैत्रिणीने प्रसंगावधान राखत तेथून आपली गाडी दुसरीकडे वळवली आणि आपला पिच्छा सोडवला. सदर प्रकार काल रात्री उशिरा १०. ३० वाजता घडला.
दरम्यान, तिने आपल्या सोशल मीडिया हँडलवर तिच्यासोबत घडलेला हा प्रकार एक स्टोरी टाकत कथन केला. अशा स्थितीत काय करावे ? ओरडावे ? किंचाळावे ? त्याला सामोरे जावे ? की वाट बदलून तेथून दूर जावे ? मनात भीती निर्माण झाल्याने मला त्या क्षणी तेथून दूर जाणे हाच योग्य पर्याय वाटला. असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. अशा प्रकारचे अनुचित कृत्य करण्याचे विचार देखील माणसाच्या मनात कसे येतात ? असाही सवाल तिने उपस्थित केला आहे.
या प्रकरणाला सोशल मिडियावरून वाचा फुटल्यानंतर उत्तर गोवा पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांचे लक्ष वेधले गेले आहे. पीडित महिलेच्या आपण संपर्कात असून घडलेल्या प्रकाराबाबत इत्यंभूत माहिती जाणून घेतली आहे. संशयितांची ओळख पटवण्यासाठी पणजी पोलिसांची अनेक पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बातमी अपडेट होत आहे.