कालापूर महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी

उत्तर गोव्यातून दक्षिणेकडे प्रवास करणाऱ्यांना नाहक मन:स्ताप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
7 hours ago
कालापूर महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी

कालापूर-बांबोळी महामार्गावर झालेली वाहतूक काेंडी. (नारायण पिसुर्लेकर)

पणजी : उत्तर गोव्याहून दक्षिण गोव्यात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी प्रवास अधिकच जिकरीचा होणार आहे. जुना मांडवी पूल बंद असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. आता दुष्काळात तेरावा महिना म्हणून कालापूर-बांबोळी महामार्गाची एक लेन कामामुळे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या लेनवर दोन्ही बाजूंनी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
या कामांमुळे लोकांना किमान दीड महिना त्रास सहन करावा लागणार आहे.कालापूर एस्ट्रेला हॉलजवळ पणजी-बांबोळी महामार्गावरील पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे, एक लेन बंद करण्यात आली आहे. उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक दुसऱ्या लेनमधून वळविण्यात आली आहे. अचानक हाती घेतलेल्या कामामुळे प्रवासी तसेच वाहनचालकांना मोठ्याप्रमाणात मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
उत्तर गोव्यातील पेडणे, म्हापसा ते दक्षिण गोव्यातील मडगाव-वास्को असा प्रवास करणाऱ्यांसाठी हा एक कंटाळवाणा अनुभव ठरत आहे. प्रथम ते पर्वरी उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडीत अडकत आहेत. नंतर एक मांडवी पूल बंद झाल्यामुळे ते नवीन पुलावर पुन्हा वाहतूक कोंडीत सापडत आहेत आणि नंतर कालापूर महामार्गाची एक लेन बंद झाल्यामुळे ते पुन्हा वाहतूक कोंडीत सापडत आहेत. त्यामुळे राजधानीत प्रवास करणे कठीण झाले आहे.
या बाबत स्थानिक आमदार रुडोल्फ फर्नांडिस म्हणाले की, महामार्गाची कामे योग्यरित्या करण्यात आली नव्हती आणि आता ती पुन्हा करावी लागत आहेत.महामार्गाचे काम हाती घेतल्यास, कोमुनिदाद, पंचायत आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. पण तसे न झाल्यामुळे, या रस्त्यावरील जुने पाईप तोडण्यात आले आणि त्यांच्या जागी एक मोठा पाईप बसवण्यात आला. तथापि, हा पाईप ओढ्यांना जोडण्याऐवजी तसाच सोडून देण्यात आला आहे. त्यामुळे मेरशी, बांबोळी आणि चिंबाल येथील पावसाचे पाणी साचून राहते, असे रुडोल्फ म्हणाले.मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. आम्ही एका लेनचे काम सुरू केले आहे आणि ते एका महिन्यात पूर्ण होईल. एकदा ते पूर्ण झाले की, ही लेन उघडली जाईल आणि दुसऱ्या लेनचे काम हाती घेतले जाईल. काम पूर्ण होण्यासाठी किमान दीड महिना लागेल, असे रुडोल्फ म्हणाले.