पणजी : खाण आणि भूगर्भशास्त्र खात्यात विविध १४ जागांवर भरती केली जाणार आहे. सर्व पदे एका वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने भरली जातील. यामध्ये सर्वाधिक ७ पदे कनिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञांच्या आहेत. तर सर्वेक्षकाची ४, कनिष्ठ खाण अभियंता (मायनिंग) २ व सहाय्यक खाण अभियंत्याच्या एका पदावर भरती केली जाणार आहे. इच्छुकांनी आपले अर्ज ११ फेब्रुवारी पर्यंत खात्याच्या पणजी मुख्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
कनिष्ठ भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पदांसाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची भूगर्भशास्त्र विज्ञानाची पदवी असणे आवश्यक आहे. या पदासाठी सहाव्या वेतन आयोगानुसार एकत्रित ४६,७१० रुपये मासिक वेतन देण्यात येईल. क्षेत्र सर्वेक्षकाच्या पदासाठी खाण किंवा स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी किंवा पदविका असणे आवश्यक आहे. तसेच एक किंवा दोन वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. या पदासाठी २७,६८० रुपये मासिक वेतन असेल.
कनिष्ठ खाण अभियंत्याच्या २ जागांसाठी खाण अभियांत्रिकीची पदवी आणि या क्षेत्रातील किमान दोन वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. उमेदवाराकडे केंद्रीय खाण सुरक्षा महासंचालक कार्यालयाचे व्यवस्थापन पात्रता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या पदासाठी ४६,७१० रुपये मासिक वेतन असेल. सहाय्यक खाण अभियंत्याच्या एका पदासाठी खाण अभियांत्रिकीची पदवी आणि या क्षेत्रातील किमान तीन वर्षे कामाचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी ४८,०९४ रुपये मासिक वेतन असेल.
वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांना कोकणीचे ज्ञान असणे आणि १५ वर्षांचा रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, जन्म दाखला, व अन्य आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील. उमेदवारांना एकापेक्षा अधिक पदांसाठी अर्ज करायचे असतील तर प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.