वेळसाव येथे विरोध डावलून रेल्वेकडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा भराव

हेलिकॉप्टरची सोय करण्याची ७५ वर्षीय महिलेची संतप्त मागणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
8 hours ago
वेळसाव येथे विरोध डावलून रेल्वेकडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा भराव

वास्को : वेळसाव येथील जमिनीच्या मालकीसंबंधी अर्ज इन्स्पेक्टर ऑफ सर्व्हे अँड लँड रेकॉर्डस् न्यायालयात प्रलंबित असतानाही रेल्वे विकास निगमने आपल्या कामाला पूर्णविराम दिला नाही. तेथील रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा भराव घातल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे. आमचा पारंपरिक रस्ता बंद होणार असल्याने संबंधितांनी आता आम्हाला हेलिकॉप्टरची सोय करावी, असे तेथील ७५ वर्षीय महिलेने संतापाने म्हटले आहे.

वेळसाव येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. तथापी काही ठिकाणी भूसंपादन न करता रेल्वे विकास निगमने काम सुरू केल्याने स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. तेथे दररोज वाद निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे तेथे वेर्णा पोलीस तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचे जवान उपस्थित असतात. त्या जमिनीवर रेल्वे अधिकार सांगत असली तरी त्यासंबंधीची कोणतीही कागदपत्रे संबंधित अधिकारी दाखवू शकत नाही. तेथे कामात अडथळे येत असल्याने रेल्वेने इन्स्पेक्टर ऑफ सर्व्हे अँड लँड रेकॉर्डस् न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर १७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे तेथील काम बंद ठेवण्याची गरज रहिवाशांनी व्यक्त केली आहे. तथापी रेल्वेचे अधिकारी ऐकण्याच्या स्थितीत नाहीत. दोन दिवसांपूर्वी त्यांनी तेथील पारंपरिक रस्त्यावर मातीचा भराव घालून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. तथापी नागरिक तसेच माजी मंत्री एलिना साल्ढाणा, खासदार कॅप्टन फर्नांडिस तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यावर रेल्वेने एक पाऊल मागे घेतले. मात्र, दुसऱ्या दिवशी दोन पावले पुढे टाकायचे हे धोरण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ठेवले आहे. त्यामुळे गुरुवारी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मातीचा भराव घालण्यात आला. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केला.

कोळसाच्या वाहतुकीसाठी रेलमार्ग दुपदरीकरण करण्यात येत आहे. ज्या उद्योगाला कोळसा पुरविला जातो, तो उद्योग कर्नाटकमधील आहे. त्यामुळे कर्नाटकातील नऊ बंदरांपैकी कोणत्याही एका बंदरात कोळसा आयात करावा, असे त्यांनी सांगितले. आपण रेल्वेच्या एकंदर भूमिकेसंबंधी दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी यांची भेट घेतली. तथापी त्यांनी याप्रकरणी लेखी तक्रार देण्याची विनंती केली आहे, असे एलिना साल्ढाणा यांनी सांगितले.

दुपदरीकरण कामामुळे आमच्या घरांच्या भितींना तडे गेले असल्याचा दावा तेथील काहीजणांनी केला.

भूसंपादन नसतानाही रेल्वेकडून काम

तेथील जमिनींचे भूसंपादन झालेले नसतानाही रेल्वे तेथे काम करीत आहे. सदर काम बंद ठेवण्यासंबंधी पंचायतीने नोटीस देऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. रेल्वे स्थानिकांना ‘होम अरेस्ट’ करू पाहत आहे काय? असा प्रश्न काँग्रेसचे ओलंसियो सिमोईस यांनी उपस्थित केला आहे. 

हेही वाचा