२०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून एम. एड अभ्यासक्रम एक वर्षाचा असेल. यासह जाणून घ्या नव्या शैक्षणीक धोरणाच्या अनुषंगाने शैक्षणिक क्षेत्रात होऊ घातलेले इतर आमूलाग्र बदल.
नवी दिल्ली :नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ पासून, दोन वर्षांचा एम. एड (शिक्षण पदव्युत्तर) अभ्यासक्रम हा एक वर्षाचा होईल. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) हा निर्णय घेतला आहे. नुकताच एनसीटीईच्या निर्णयानंतर बीएड अभ्यासक्रमदेखील एक वर्ष करण्याची घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
* १० वर्षांनंतर बीएड अभ्यासक्रमात बदल
२०१४ पर्यंत बीएड अभ्यासक्रम एक वर्षाचा होता, तोच फॉरमॅट आता पुन्हा सुरू होणार आहे. तर दोन वर्षांचा एम. एड अभ्यासक्रम २०२६ पासून एक वर्षाचा होईल.
* कोण प्रवेश घेऊ शकेल?
एनसीटीईचे अध्यक्ष पंकज अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षाचा बीएड अभ्यासक्रम करणारे उमेदवार, दोन वर्षांचा शिक्षक शिक्षण अभ्यासक्रम करणारे उमेदवार आणि चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम करणारे उमेदवार एम.एडमध्ये प्रवेश घेऊ शकतात.
* एम.एड अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत
याबाबत हाती आलेल्या प्राथमिक महितीनुसार, एनसीटीई यासाठी नवीन अभ्यासक्रम तयार करत असून त्यासाठी विविध एजन्सी आणि संस्थांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. यासाठीची प्रवेश प्रक्रिया काशी असेल हे अद्याप ठरले नाही. सध्या चार वर्षांच्या एकात्मिक शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षेद्वारे प्रवेश घेतला जातो. ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) द्वारे घेतली जाते.
* नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे
पदव्युत्तर आणि चार वर्षांचे एकात्मिक शिक्षक शिक्षण घेतलेले उमेदवार एक वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात. एक वर्षाच्या बीएड अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रमाचा आराखडा तयार करण्यासाठी एनसीटीईने एक समितीही स्थापन केली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे.
बातमी अपडेट होत आहे.