साहित्यिकांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप माध्यमांवर अवलंबून राहू नये!

हेमा नाईक : तिसऱ्या युवा कोकणी कथा संमेलनाचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January, 10:05 pm
साहित्यिकांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप माध्यमांवर अवलंबून राहू नये!

युवा कोकणी कथा संमेलनाचे उद्घाटन करताना ज्येष्ठ लेखिका हेमा नाईक. सोबत डॉ. प्रकाश पर्येकर व इतर.

पणजी : आजचे युवा साहित्यिक आपले साहित्य फेसबुक आणि व्हॉट्सअॅप माध्यमांवर पोस्ट करतात. पण, त्यावर मिळणाऱ्या लाईक्स आणि शेअर्सवर अवलंबून राहू नका. या लाईक्ससाठी तरुणांनी त्यांच्या साहित्याचा दर्जा गमावू नये. युवा कथाकारांना नवीन आणि अनोख्या गोष्टी शिकणे आवश्यक आहे, असा सल्ला ज्येष्ठ लेखिका हेमा नाईक यांनी युवकांना दिला.
गोवा विद्यापीठात आयोजित केलेल्या तिसऱ्या युवा कोकणी कथा संमेलनात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. सदर संमेलन गोवा विद्यापीठ, शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाविद्यालयाचे कोकणी अध्ययन शाखा आणि कोकणी सारस्वत मंडळाने आयोजित केले होते. यावेळी व्यासपीठावर शणै गोंयबाब भाषा आणि साहित्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रकाश पर्येकर, संमेलनाचे अध्यक्ष रामनाथ गावडे, कोकणी अध्ययन शाखेचे संचालक डॉ. हनुमंत चोपडेकर, संमेलनाची कार्याध्यक्ष, सहाय्यक प्राध्यापक सानिका गावकर आणि कोकणी सारस्वत मंडळाच्या अध्यक्षा राणी कामत उपस्थित होत्या.
याप्रसंगी कोकणी अध्ययन शाखेने युवा कोकणी कथाकारांच्या कथासंग्रहांचे प्रकाशन केले. तसेच संपदा सवासे यांच्या ‘अमूल्य देण’ या कथासंग्रहाचे प्रकाशन केले. याप्रसंगी बोलताना हेमा नाईक म्हणाल्या, इंटरनेट आणि इतर भाषांमधील अनुवादांद्वारे आपल्या कलाकृती जगभर पोहोचल्याने आपण जागतिक झालो आहोत. मात्र, यामधून लेखकांना वेगळेपण राखायचे असेल तर त्यांना आपली नजर विस्तृत करावी लागेल.
गेल्या ५० वर्षांत आपण कोकणीच्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. त्या काळातील कथाकारांना त्यावेळी सन्मानाचे स्थान मिळाले नाही किंवा त्यांचे विचार ऐकले गेले नाहीत. मात्र, त्यांची पुस्तके अाजही उपलब्ध आहेत त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन घेऊ शकतो. कोकणीबरोबरच इतर अनुवादित साहित्य वाचण्याची गरज आहे, तरच आपल्याला खरी परिस्थिती कळेल, असेही नाईक यांनी सांगितले.
या दोन दिवसांच्या संमेलनात शिकण्यासारखे खूप काही आहे. पण, ही स्थिती आमच्या काळात नव्हती. त्यावेळी केवळ परिषदा आणि संमेलने ऐकून आम्ही शिकायचो. त्यावेळी कार्यशाळा खूप कमी होत्या. या कथा महोत्सवातून नवीन पिढीला खूप मार्गदर्शन मिळेल. आमचा काळ वेगळा होता, आम्ही कथा लिहायला शिकलो नव्हतो. तुम्हाला स्वतःचे नाव कमवायचे आहे आणि आजच्या डिजिटल युगात वेगळेपणा आणि गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न करायला हवा, असे आवाहनही त्यांनी युवांना केले.
कोकणीचा प्रवास गोव्याबाहेरही जाणे आवश्यक!
कोकणी भाषेतील कथा फार कमी आहेत. अशा कथा लिहिताना, त्या दुसऱ्या भाषेत अनुवादित करणे आवश्यक असते. कोकणी केवळ गोव्यातील वाचकांपुरती मर्यादित न राहता हे साहित्य संपूर्ण भारतात अनुवादित होण्यासाठी प्रयत्न करा. केवळ कोकणीच नाही तर परदेशातील वाचकांनीही तुमची प्रशंसा करायला हवी, यासाठी कोकणीचा प्रवास गोव्याबाहेरही जाणे आवश्यक आहे, असे उद्गार डॉ. प्रकाश पर्येकर यांनी काढले.

हेही वाचा