गोवा : शैक्षणिक वर्ष १ एप्रिल पासून केल्याने शाळांची वेळ बदलावी लागणार नाही : प्रसाद लोलयेकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January, 04:20 pm
गोवा : शैक्षणिक वर्ष १ एप्रिल पासून केल्याने शाळांची वेळ बदलावी लागणार नाही : प्रसाद लोलयेकर

पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर शाळांची वेळ बदलावी लागणार होती. असे होऊ नये यासाठीच शैक्षणिक वर्ष १ एप्रिल पासून सुरू करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शाळांचा कालावधी पूर्वी प्रमाणेच राहील. या निर्णयामुळे उन्हाळी किंवा अन्य शालेय सुट्ट्यांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी स्पष्ट केले. गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

लोलयेकर यांनी सांगितले की, राज्यातील अनेक शाळांत सकाळी एक तर संध्याकाळी दुसऱ्या इयत्तांचे वर्ग चालतात. त्यामुळे शाळांची वेळ दुपारी २ च्या पुढे वाढवता येणे शक्य नव्हते. एप्रिल महिना शाळा सुरू केल्याने शाळांची वेळ वाढवावी लागणार नाही. शैक्षणिक वर्ष १ एप्रिल पासून सुरू झाले तरी उन्हाळी, चतुर्थी , नाताळ किंवा दिवाळीच्या सुट्टीत कोणताही बदल होणार नाही. दिवाळीच्या सुट्टीतील काही दिवस शाळा बाह्य उपक्रम करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत. 

ते म्हणाले, नवीन निर्णयाबाबत शुक्रवारी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येईल. यानंतर शिक्षण क्षेत्रातील अन्य भागधारकांची बैठक घेऊन मगच निर्णयाची अंमलबजावणी होईल. यापूर्वी शैक्षणिक वर्षातील एक टर्म मोठी तर दुसरी छोटी होत होती. नवीन निर्णयाने दोन्ही टर्ममध्ये समानता येईल. केंद्र सरकारची माध्यान आहार योजना घेण्यासाठी एक ठराविक वेळ भरून काढणे आवश्यक असते. १ एप्रिल पासून शाळा सुरू केल्यास ही वेळ भरून निघणे सहज शक्य होणार आहे.

तरच अपार कार्ड सक्तीचे 

विद्यार्थ्यांना अपार कार्ड करणे अनिवार्य नाही. मात्र त्याला सरकारी सवलती, योजना घ्यायच्या असतील तर मात्र अपार कार्ड असणे सक्तीचे करण्यात आले आहे

हेही वाचा