परिपत्रक जारी : एनईपीच्या कार्यवाहीसाठी शैक्षणिक वेळापत्रकात बदल
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (एनईपी) कार्यवाहीसाठी नवे शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. इयत्ता सहावी ते दहावी व बारावीचे वर्ग एप्रिलमध्ये सकाळी ११.३० वाजेपर्यंत चालतील. १ मे ते ३ जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी असेल. यानंतर ४ जूनपासून पूर्वीच्या वेळेप्रमाणे वर्ग सुरू राहतील. याबाबतचे परिपत्रक शिक्षण संचालकांनी जारी केले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार आठवड्याला शिकविण्याचे ३६ ते ३९ तास होणे आवश्यक आहे. हे तास भरून येण्यासाठी एक तर शैक्षणिक दिवस वाढवावे लागतील किंवा शाळा/विद्यालयांच्या वेळा वाढवाव्या लागतील. शिकवण्याचे तास भरून काढण्यासाठी एप्रिलमध्ये वर्ग घेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. १ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत सकाळी ११.३० पर्यंत वर्ग घेतल्याने शिकविण्याचे तास भरून येणार आहेत.
यापूर्वी शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू व्हायचे. यामुळे अंतिम परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना एप्रिलनंतर सुट्टीच असायची. यामुळे महिन्यापेक्षा अधिक दिवस सुट्टी मिळायची. आता ही प्रथा बंद होणार आहे. यंदा नववीसाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. यैत्या शैक्षणिक वर्षी सहावी व दहावीसाठी एनईपी लागू होईल. तसेच दहावीचा निकाल लागून अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला उशीर होतो. यामुळे इयत्ता अकरावीचे शैक्षणिक वर्ष यावर्षी जूनमध्येच सुरू होणार आहे.
अ. गो. माध्यमिक शिक्षकांंचा विरोध
एप्रिल महिन्यात गोव्यात उष्णतेचे प्रमाण जास्त असते. यामुळे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांनाही शिकवणे त्रासदायक होते. त्यासाठी एप्रिलमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी अखिल गोवा माध्यमिक शिक्षक संघटनेने केली आहे. संघटनेचे अध्यक्ष सूरज व्हिक्टोरिया यांनी हे निवेदन शिक्षण संचालकांना सुपूर्द केले आहे.
शाळांची वेळ बदलावी लागणार नाही
पणजी : राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर शाळांची वेळ बदलावी लागणार होती. असे होऊ नये यासाठीच शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शाळांचा कालावधी पूर्वीप्रमाणेच राहील. या निर्णयामुळे उन्हाळी किंवा अन्य शालेय सुट्ट्यांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे शिक्षण संचालक प्रसाद लोलयेकर यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
लोलयेकर यांनी सांगितले की, राज्यातील अनेक शाळांत सकाळी एक तर संध्याकाळी दुसऱ्या इयत्तांचे वर्ग चालतात. त्यामुळे शाळांची वेळ दुपारी २ च्या पुढे वाढवता येणे शक्य नव्हते. एप्रिल महिन्यात शाळा सुरू केल्याने शाळांची वेळ वाढवावी लागणार नाही. शैक्षणिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू झाले तरी उन्हाळी, चतुर्थी, नाताळ किंवा दिवाळीच्या सुट्टीत कोणताही बदल होणार नाही. दिवाळीच्या सुट्टीतील काही दिवस शाळा बाह्य उपक्रम करण्याबाबत आम्ही विचार करत आहोत.
प्रसाद लोलयेकर म्हणाले
- नवीन निर्णयाबाबत शुक्रवारी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात येईल. यानंतर शिक्षण क्षेत्रातील अन्य भागधारकांची बैठक घेऊन मगच निर्णयाची अंमलबजावणी होईल.
- यापूर्वी शैक्षणिक वर्षातील एक टर्म मोठी, तर दुसरी छोटी होत होती. नवीन निर्णयाने दोन्ही टर्ममध्ये समानता येईल.
- केंद्र सरकारची माध्यान आहार योजना घेण्यासाठी एक ठराविक वेळ भरून काढणे आवश्यक असते. १ एप्रिलपासून शाळा सुरू केल्यास ही वेळ भरून निघणे सहज शक्य होणार आहे.