अ‍ॅप सेवा वापरणाऱ्या टॅक्सींना मीटर सक्तीतून वगळणार !

मोटार वाहन नियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10 hours ago
अ‍ॅप सेवा वापरणाऱ्या टॅक्सींना मीटर सक्तीतून वगळणार !

पणजी : अ‍ॅप एग्रीगेटरअंतर्गत नोंदणीकृत टॅक्सींना आता भाड्यासाठी मीटर बसवण्याची सक्ती राहणार नाही. अ‍ॅप सेवेतूनच मीटरची व्यवस्था केली जाणार आहे. तसेच एसएमएस आणि ईमेलद्वारे बिल पाठवण्याची सुविधा असल्यास प्रिंटरचीही आवश्यकता भासणार नाही. अ‍ॅप सेवेचा वापर करून टॅक्सींना मीटरमध्ये सवलत देण्याचा प्रस्ताव आहे.

याविषयीची प्रस्तावित अधिसूचना वाहतूक खात्याने जारी केली आहे. यासाठी मोटार वाहन नियमांच्या १४० व्या कलमात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आहे. ज्या टॅक्सींनी मीटर बसवले आहेत त्यांना ते ठेवण्यास हरकत नाही. तथापि, टॅक्सी अ‍ॅप सेवेअंतर्गत नसलेल्या टॅक्सींना मीटर बसवणे आवश्यक असेल. गोव्यातील टॅक्सी चालकांचा मीटर तसेच अ‍ॅप टॅक्सी सेवेला विरोध आहे. राज्य सरकारने वापरकर्त्यांना स्वतःचे अॅप तयार करण्याची आणि त्याअंतर्गत नोंदणी करण्याची परवानगी दिली आहे.

 हरकत घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत 

सूचना किंवा हरकत घेण्यासाठी १५ दिवसांची मुदत आहे. सूचना किंवा हरकत १५ दिवसांच्या आत वाहतूक संचालक, जुन्ता हाऊस, पणजी यांना सादर करावे लागणार असून सूचना आणि हरकतींचा विचार केल्यानंतर अंतिम अधिसूचना जारी केली जाईल.