पणजी : आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दहावी किंवा बारावीच्या समांतर दर्जाची शैक्षणिक पात्रता देण्याबाबत विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गुरुवारी पणजीत डिचोली, फार्मागुडी, वास्को, काकोडा आणि म्हापसा येथे उभारण्यात येणाऱ्या सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाच्या ऑनलाईन पायाभरणी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, संचालक एस. एस. गावकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आठवी उत्तीर्ण आणि दहावी अनुत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांनी एका वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्याची शैक्षणिक पात्रता ही दहावीच्या समांतर दर्जाची समजण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण खात्याकडून लवकरच आदेश काढण्यात येईल. सरकारी कार्यालयात एमटीएस पदासाठी दहावी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. नवीन नियम आल्यावर दहावी अनुत्तीर्ण पण आयटीआय झालेले विद्यार्थी देखील सरकारी खात्यात एमटीएस पदासाठी अर्ज करू शकतील.
ते म्हणाले, याशिवाय दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्याने दोन वर्षांचा आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्याची शैक्षणिक पात्रता ही बारावीच्या समान दर्जाची करण्यात येणार आहे. त्या विद्यार्थ्याला सध्याच्या नियमाप्रमाणे शालांत मंडळाच्या दोन भाषा विषयांची परीक्षा द्यावी लागणार नाही. तो विद्यार्थी बारावी उत्तीर्ण आहे असे समजले जाईल. यासाठी अभ्यासक्रमात काही बदल करावा लागणार आहे. या विद्यार्थ्यांना बीए किंवा बीकॉमसाठी देखील प्रवेश घेता येईल. पुढील वर्षापासून याची अंमलबजावणी होणार आहे.
विदेशात मिळू शकतो एक लाख रुपये पगार!
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुढील काही दिवसात गोवा सरकार बीव्हीजी समूहासोबत करार करणार आहे. यानुसार आयटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना जर्मनी किंवा अन्य देशात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांना महिन्याला एक लाख रुपयेपर्यंत पगार मिळू शकतो.
...तर इंटर्नशिप उमेदवारांना कायम करावे!
काही कंपन्या इंटर्नशिप करणाऱ्या उमेदवारांना कायम करण्याचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून दोन ते तीन वर्ष कमी पगारात काम करून घेतात. यापुढे दोन वर्षांपेक्षा जास्त इंटर्नशिप करत असणाऱ्या उमेदवाराला कायम करण्याची जबाबदारी त्या कंपनीची असणार आहे. याबाबत कामगार खात्याला सूचना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.