पदपूलामुळे होडीतून जीव मुठीत घेऊन प्रवास जरी बंद झाला असला तरी, आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास उडते ग्रामस्थांची तारांबळ
फोंडा : आंबे-दाबाळ गावांना जोडणारा पदपूल उभारून ३२ महिने उलटले तरी अजून पर्यंत जोडरस्ता तयार करण्यात सरकारला अपयश आले आहे. पदपूलासाठी आवश्यक जोडरस्ता तयार केला नसल्याने ग्रामस्थामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. पदपुल उभारल्याने जीव मुठीत घेऊन होडीतून केला जाणारा प्रवास बंद झाला आहे. पण आपत्कालीन वेळी रुग्णवाहिका सुद्धा गावात नेणे कठीण बनले आहे. त्यामुळे पदपुलाचा चांगला वापर करण्यात मिळत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करत आहे. बांधकाम मंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे आणि एकदाचा रखडलेला जोडरस्ता तयार करून द्यावा अशी मागणी स्थानिक लोक करीत आहे.
सुमारे तीन अडीज वर्षांपूर्वी दाबाळ गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आंबे गावात जाण्यासाठी दूधसागर नदीतून जीव मुठीत घेत होडीतून प्रवास करावा लागत होता. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना घरीच ठेवण्याची वेळ स्थानिक लोकांवर येत होती. स्थानिक लोकांच्या मागणीनुसार राज्य सरकारने अंदाजे १० कोटी रुपये खर्च करून पदपूल उभारला. दि. २० मे २०२२ रोजी पदपुलाचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी राजकीय नेत्यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत दोन्ही बाजूंनी पदपुलासाठी समर्पक जोड रस्ता उभारून देण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. दाबाळ येथील मुख्य रस्त्यापासून १०० अंतराचा जोडरस्ता तयार करण्याची अत्यंत गरज आहे. परंतु जोडरस्ता तयार करण्याची प्रक्रिया अजून सुरू करण्यात आलेली नाही.
पदपुलाच्या उद्घाटनानंतर ३२ महिने उलटले तरी जोडरस्ता तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात सरकारी अधिकारी वर्ग रस दाखवत नसल्याचे दिसून आले आहे. जोडरस्ता तयार करण्यासाठी जमीन मालक परवानगी देण्यासाठी तयार आहे. पण मुळात सरकारी यंत्रणा ठप्प झाल्याने जोड रस्ता तयार करण्याचा प्रयत्न अजून पर्यंत यशस्वी झाला नाही. त्याचा फटका स्थानिक लोकांना बसला आहे. जोडरस्ता तयार केला नसल्याने अंदाजे १० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला पदपूलावरून चालत जाण्यातच आंबे गावातील लोक समाधान व्यक्त करत आहेत. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिका गावात नेता येत नाही. त्यामुळे रुग्णांना अन्य मार्गाने नेण्याची वेळ कुटुंबीयांवर येते.
दरम्यान धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील आंबे गावातील दूधसागर नदीवर उभारलेल्या हा पदपूल पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनला आहे. बंधाऱ्यावर उभारलेल्या पदपुलाजवळ गेल्या दोन वर्षापासून बरेच लोक सहलीसाठी येत आहे. सिने अभिनेता तथा नाट्यकलाकार प्रसाद पंडित दरवर्षी या ठिकाणी सहलीसाठी येत असतात. पण पदपुलाजवळ वाहने नेण्यास मिळत नसल्याने येथे येणारे पर्यटक देखील नाराजी व्यक्त करतात.
दाबाळ व आंबे गावांना जोडणारा पदपूलाचा जोडरस्ता हा दाबाळच्या बाजूला पूर्ण झालेला नाही. सदर जोडरस्ता किर्लपाल पंचायत क्षेत्रात येतो. महत्वाचे म्हणजे किर्लपाल पंचायत क्षेत्रात विद्यमान आमदार गणेश गावकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, माजी मंत्री दीपक पाऊसकर व जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर या राजकारण्याचे वास्तव्य आहे. त्यामुळे जोडरस्ता रखडण्याचे नेमके कारण काय असावे ? या प्रश्नाची उकल अजून पर्यंत स्थानिक लोकांना झालेली नाही. प्रशासनाने व संबंधित खात्याने लक्ष देत हे काम पूर्णत्वास न्यावे अशी मागणी होत आहे.