दाबोळी बोगमाळो चौकात खोदकाम करताना इंधनवाहिनी फुटल्याने घबराट

इंधन वाहिनी रिकामी असल्यामुळे टळला अनर्थ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
दाबोळी बोगमाळो चौकात खोदकाम करताना इंधनवाहिनी फुटल्याने घबराट

वास्को : दाबोळी - बोगमाळो चौकापासून काही अंतरावर शुक्रवारी रस्त्याच्याकडेला खोदकाम करताना तेथील इंधनवाहिनी फुटल्यावर मोठ्या आवाजात निघणाऱ्या वायूमुळे आसपासच्या नागरिकांमध्ये घबराट पसरली. खबरदारीची उपाययोजना म्हणून वाहतूक पोलीस व वास्को पोलिसांनी त्या मार्गावरील वाहतूक बंद करून ती अन्यमार्गाने वळविली. सुदैवाने ती इंधनवाहिनी रिकामी असल्याने काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.


चिखली बोगमाळो चौकात सध्या उड्डाण पूल, रस्ता विस्तारीकरण, जलवाहिनी घालणे आदी कामे चालली आहेत. शुक्रवारी दुपारी एका ठिकाणी खोदकाम करीत असताना जमिनीखाली असलेल्या इंधन वाहिनाला नुकसान पोहचले. इंधन वाहिनीला मोठा तडा गेल्याने त्यातून मोठ्या प्रमाणात वायू बाहेर येऊ लागला. त्यामुळे तेथे काम करणाऱ्या कामगार व इतरांची धावपळ उडाली. माहिती मिळताच पोलीस, वाहतूक पोलीस, गोवा अग्निशमन दल आदी यंत्रणा तेथे पोहचली. खबरदारीची उपाययोजना म्हणून तेथील वाहतूक बंद करण्यात आली. वाहतूक चिखली मार्गे, विशाल मेगा मार्ट व इतर मार्गाने वळविण्यात आली.

दरम्यान, झुआरी इंडियन ऑईल टँकिंगच्या आगारात माहिती मिळताच सरव्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक व इतर तेथे पोहचले. सुदैवाने आज त्यातून इंधन वाहून नेण्यात येत नसल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यांनी तेथे कोणताही धोका नसल्याचे मामलेदार पंडित यांना सांगितल्यावर तेथील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

संबंधित कंत्राटदाराला व त्याच्या कामगारांना सदर इंधन वाहिनीची माहिती देण्यात आली होती. तथापी आमच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.

शुक्रवारी इंधनवाहिनीला हानी पोहचू नये यासाठी तेथे आम्ही एक सुरक्षारक्षक ठेवला होता. इंधनवाहिनी जमिनीखालून गेल्याचे कळावे यासाठी तेथे सिमेंटचे ब्लॉक उभारले होते. तथापी तेथे खोदकाम करताना संबंधितांनी सुरक्षा रक्षकाचे न ऐकता शेवटी त्या इंधनवाहिनीची मोडतोड केलीच. शनिवारी ऑईल टँकर जहाज येणार असल्याने आम्ही या इंधनवाहिनीची चाचणी करण्यासाठी त्यामध्ये हवा भरली होती. जेणेकरून तिची कोठे हानी वगैरे झाली नाही ना हे समजण्यास मदत होते. त्यामुळे जेव्हा इंधनवाहिनीला तडा गेला तेव्हा त्यामध्ये हवा होती. ती वेगाने बाहेर पडू लागली. याप्रकरणी आम्हाला अलर्ट मिळाला होता, असे नाईक यांनी सांगितले.

वाहिनीच्या दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार आहे. तथापी त्यासाठी चार पाच दिवस लागतील. त्यानंतर चाचणी केल्यावर या वाहिनीतून इंधन वाहून नेले जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

सोमवारी आम्ही झुआरी इंडियन ऑईल टँकिंगचे अधिकारी व कंत्राट कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करणार असल्याचे मामलेदार पंडित यांनी सांगितले.

गोव्यात इंधन टंचाई भासणार नाही : नाईक

सदर वाहिनी दुरुस्त करून तिची चाचणी घेण्यास चार ते पाच दिवस लागणार आहेत. या इंधनवाहिनीतून पेट्रोल, डिझेल वाहून नेले जाते. तथापी झुआरी इंडियन ऑईलच्या आगारात आणखी आठ ते दहा दिवस पुरेल एवढे इंधन असल्याने गोव्यात इंधनाची टंचाई भासणार नसल्याचे सरव्यवस्थापक श्रीप्रसाद नाईक यांनी सांगितले. शनिवारी ऑईल टँकर मुरगाव बंदरात येण्याची शक्यता होती. तथापी या घटनेमुळे पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

२०११ मधील भयंकर घटनेची आठवण

या घटनेमुळे ऑगस्ट २०११ मध्ये वरुणपुरी मांगोरहिल तसेच धाकतळे मांगोरहिल येथे नाफ्तामुळे घडलेल्या भयंकर घटनेची नागरिकांना आठवण झाली. वरुणपुरी येथे राष्ट्रीय महामार्गासाठी खोदकाम करताना जेसीबीने तेथील नाफ्ता वाहिनी फोडली होती. पावसाच्या पाण्यामुळे नाफ्ता वाहत नाल्यामध्ये मिसळला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मोठा भडका उडाला होता. काहीजण मृत्युमुखी पडले, घरे जळाली होती.

हेही वाचा