गवताला आग लागल्याने दुर्घटना : तीन बोटी वाचविण्यात यश
पणजी : करंझाळे - पणजी येथे गवताला आग लागून तीन मच्छीमारी फायबर बोटी जळून खाक झाल्या, तर अग्निशमन दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे तीन बोटी वाचविण्यात यश आले.
अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार ३० रोजी सायंकाळी ३.५८ वाजता करंझाळे-पणजी येथे गवताला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानंतर वरील माहिती कक्षाने पणजी अग्निशमन दलाला दिली. स्टेशन फायर ऑफिसर रुपेश सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सब आॅफिसर फ्रान्सिस आझावेदो, ड्राइव्हर ऑपरेटर नितीन शिरोडकर, फायर फायटर सत्यवान गावस, गितेश फडते व इतरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी वरील पथकाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आग भडकल्याने त्या ठिकाणी ठेवलेल्या भंगार फायबर बोटींनी पेट घेतला. याची माहिती नियंत्रण कक्षाला देऊन अतिरिक्त मदत मागविण्यात आली. मुख्यालयाचे सब ऑफिसर श्याम पिळगावकर, ड्राइव्हर ऑपरेटर नीलेश फडते, लिडिंग फायर फायटर रवींद्र नारुलकर, फायर फायटर गौतम पेडणेकर, समीर खान आणि मुकुंद मांद्रेकर या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान, अग्निशमन दलाने त्वरित आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे तीन बोटी वाचविण्यात यश आले. याप्रकरणी पणजी पोलिसांनी आगीची दुर्घटना म्हणून नोंद करून कारवाई सुरू केली आहे.