म्हापशातील पाच ‘फास्टफूड’ सील

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची कार्यवाही

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th January, 12:35 am
म्हापशातील पाच ‘फास्टफूड’ सील

म्हापसा : येथील अलंकार थिएटर परिसरातील गोवा राज्य प्रदूषण मंडळाकडून आवश्यक परवाना न घेतलेले पाच फास्टफूडवजा खाद्यपदार्थ विक्री गाळे उपजिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार मामलेदार कार्यालयाकडून सील करण्यात आले.

सील केलेल्या पाच आस्थापनांमध्ये मेसर्स फुड फुजन फास्ट फूड, मेसर्स असगर अली शेख, मेसर्स मामास् कोल्ड ड्रिंक अ‍ॅण्ड फास्ट फूड, मेसर्स पापास् फूड कॉर्नर व मेसर्स केणी कोल्ड ड्रिंक यांचा समावेश आहे.

काही महिन्यांपूर्वी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या सर्वेक्षणात म्हापसा शहरातील बर्‍याच खाद्य विक्री विशेषतः फास्टफूड आणि रेस्टॉरन्ट व्यावसायिकांनी मंडळाचा आवश्यक परवाना न घेता व्यवसाय चालवला असल्याचे आढळून आले होते. त्यानुसार, प्रदूषण मंडळाने संबंधित आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तरीही मंडळाच्या नियमांचे पालन न केल्यामुळे संबंधित आस्थापने बेकायदा ठरवून ती सील करण्याची कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश बार्देश उपजिल्हाधिकार्‍यांना मंडळाने दिले होते.

उपजिल्हाधिकार्‍यांनी बार्देश मामलेदारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशाची कार्यवाही करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, मंगळवारी दि. २८ रोजी दुपारी मामलेदार कार्यालयामार्फत तलाठ्यांनी वरील सर्व आस्थापनांना नोटीस बजावत सील ठोकले आहे.

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना न घेता व्यवसाय करणार्‍या म्हापसा शहरातील अनेक आस्थापनांना मंडळाने कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या. तसेच सदर आस्थापने सील करण्याचे निर्देश दिले होती. याची कार्यवाही आता उपजिल्हाधिकार्‍यांकडून होत आहे, असे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन महेश पाटील यांनी सांगितले. 

हेही वाचा