चार दुचाकी जप्त, अल्पवयीनासह अन्य एकास अटक , दोघे फरार
म्हापसा : पर्वरी पोलिसांनी धडक कारवाई करत दुचाकी व मंदिरात चोरी करणाऱ्या टोळीचा पदार्फाश करीत ४ लाख रूपयांच्या ४ दुचाकी जप्त केल्या. याप्रकरणी ललित वायंगणकर (१९, रा. सडये, शिवोली) याच्यासह एका १७ अल्पवयीन मुलास अटक केली. तर या टोळीतील अजून दोघेजण फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
धुळेर म्हापसा राहणारा व मूळ महाराष्ट्रातील अल्पवयीन मुलाचा गेल्या १६ जानेवारी रोजी झालेल्या मयडे पुलार येथील श्री रवळनाथ मंदिर फोडीप्रकरणात समावेश असल्याचे उघड झाल्यामुळे त्यास म्हापसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, पर्वरीतील पीडीए कॉलनी मधून गेल्या दि. १९ जानेवारी रोजी उतररात्री १.१० च्या सुमारास सौरभ नामक युवकाची जीए ०४ पी ५१०० क्रमांकाची बुलेट मोटारसायकल चोरीस गेली होती. पोलिसांनी या चोरी प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासकार्य सुरू केले. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांची ओळख पटवली.