पणजी : ‘डिजिटल अरेस्ट’द्वारे शिवोली - बार्देश येथील ६८ वर्षीय वृद्धेला तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. सायबर विभागाने या प्रकरणात पाचवा संशयित राहुल मिश्रा (बिलासपूर - उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे.
शिवोली-बार्देश येथील बेर्नाडित फर्नांडिस (६८) या वृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, २६ ते २८ डिसेंबर २०२४ रोजी अज्ञात व्यक्तीने तिला वॉट्सअॅप कॉल करून दिल्ली गुन्हे शाखेचा अधिकारी असल्याचे सांगत संपर्क साधला. त्याने तक्रारदाराच्या नावाने गुन्हा दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच तिच्या ओळखपत्रांचा गैरवापर करून मनी लाँड्रिंग झाल्याचे सांगितले. याशिवाय तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचे पत्र आल्याची माहिती दिली.
तिला हे प्रकरण मिटविण्यासाठी विविध बँक खात्यात १ कोटी रुपये जमा करण्यास भाग पाडले. तक्रारीची दखल घेऊन सायबर विभागाचे पोलीस निरीक्षक दिपक पेडणेकर यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. दरम्यान सायबर विभागाने अधिक चौकशी केली असता, एसएन पुरम-विजयवाडा येथील एका दागिन्यांच्या दुकानाच्या बँक खात्यात ४० लाख जमा झाल्याचे समोर आले. त्यानुसार, सायबर विभागाने विजयवाडा येथून संशयित यरमला वेंकटेश्वरलू याला ताब्यात घेतले आणि ७ रोजी गोव्यात आणून अटक केली. त्यानंतर सायबर विभागाने या प्रकरणात आणखीन संशयित सहभाग असल्यामुळे विषक आर,मोहम्मदशून सुलेमान आणि रोशन शेख या संशयितांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता, यात उत्तर प्रदेशातील एक संशयिताचा सहभाग समोर आला.
त्यानंतर सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि अतिरिक्त अधीक्षक अक्षत आयुष्य याच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नवीन नाईक, कॉ. भालचंद्र नाईक, सिद्धारनय मठ, समुय भगत आणि यश कोळे या पथकाला उत्तर प्रदेशाला रवाना करण्यात आले. पथकाने बिलासपूर - उत्तर प्रदेश येथील राहुल मिश्रा याला अटक केली. त्याची चौकशी केली असता, त्याच्याकडून २ मोबाईल, एक लॅपटॉप, एक टॅब आणि दोन हार्डडिस्क जप्त केले. तसेच तो दोन बँक खाते वापरत होता. त्या बँक खात्यातून २.५८ कोटी रुपयांच्या व्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणातील संशयित यरमला वेंकटेश्वरलू, विषक आर आणि मोहम्मदशून सुलेमान या तिघा संशयितांना पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. तर, रोशन शेख याच्या जामीन अर्ज फेटाळून लावला. त्याने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.