ड्रग्जप्रकरणी तपास प्रक्रियेतील त्रुटींमुळे ब्रिटिश नागरिकाला सशर्त जामीन

गुन्हा शाखेने डिसेंबर २०२३ मध्ये केली होती कारवाई

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
5 hours ago
ड्रग्जप्रकरणी तपास प्रक्रियेतील त्रुटींमुळे ब्रिटिश नागरिकाला सशर्त जामीन

पणजी : गुन्हा शाखेने डिसेंबर २०२३ मध्ये वागातोर फुटबॉल मैदानाजवळ छापा टाकून जाॅन पार्किन्सन या ब्रिटिश नागरिकाकडून १५ लाख रुपये किमतीचे १.९१४ ग्रॅम १९० एलएसडी पेपर आणि ४.३५३ एलएसडी लिक्विड जप्त केले होते. या छाप्यादरम्यान संशयिताच्या तपासणी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले नाही. तसेच प्रक्रियेत त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित जाॅन पार्किन्सन याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी जामीन दिला आहे.

वागातोर येथील फुटबॉल मैदानाच्या परिसरात लिव्हज क्लबजवळ विदेशी ड्रग्ज तस्कर येणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्याला दिली होती. त्यानुसार, गुन्हा शाखेच्या पथकाने ४ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.१५ वाजल्यापासूनच त्या ठिकाणी सापळा रचला होता. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास एक विदेशी नागरिक दुचाकीवरून त्या ठिकाणी आला. त्याची चौकशी केली असता, त्याने आपण जाॅन पार्किन्सन असल्याची माहिती दिली. पथकाने त्याची आणि दुचाकीची झडती घेतली असता, त्याच्याकडून १५ लाख रुपये किमतीचे १.९१४ ग्रॅमचे १९० एलएसडी पेपर, ४.३५३ ग्रॅम एलएसडी लिक्विड ड्रग्ज जप्त केले. याशिवाय दुचाकी आणि दोन मोबाईलही जप्त केले होते. त्यानंतर गुन्हा शाखेने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली होती. न्यायालयाने प्रथम गुन्हा शाखेची कोठडी दिली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून संशयिताची झडती राजपत्रित अधिकारी किंवा न्यायदंडाधिकाऱ्यांच्या समोर करण्याची आवश्यकता होती. तसेच या संदर्भात संशयिताला माहिती देणे बंधनकारक होते. तसेच ही विनंती संशयिताने फेटाळल्यास किंवा मान्य केल्यास त्याची लेखी स्वरूपात नोंद करणे महत्त्वाचे होते. मात्र, या प्रकरणात ते पाळले गेले नसल्याचा युक्तिवाद वकिलांनी मांडला. या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू एेकून घेतल्यानंतर वरील निरीक्षण नोंदवून संशयित जाॅन पार्किन्सन याला ५० हजार रुपये व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला.

मागे घेतल्यानंतर पुन्हा केला जामीन अर्ज

जाॅन पार्किन्सन याने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज २३ डिसेंबर २०२४ रोजी मागे घेतला. आता त्याने पुन्हा जामीन अर्ज दाखल करून आपल्याला बनावट गुन्ह्यात अडकवल्याचा दावा केला. या प्रकरणी अॅड. रोहन देसाई यांनी संशयितांतर्फे बाजू मांडली. 

हेही वाचा