स्विमिंग पूलमध्ये बुडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January, 12:32 am
स्विमिंग पूलमध्ये बुडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू

म्हापसा : ग्रॅण्ड मरड, साळगाव येथील एका सिल्वर रॉक व्हिलाच्या जलतरण तलावात पडून व्योम जयेश राऊत (रा. पश्चिम वाशी, मुंबई) या ३ वर्षीय पर्यटक मुलाचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. राऊत कुटुंबीय दोन दिवसांपूर्वी गोव्यात पर्यटनासाठी आले होते. ते सिल्वर रॉक व्हिलामध्ये उतरले होते. घटनेच्या दिवशी बुधवारीच हे कुटुंब मुंबईला परतणार होते.

मुलाचे वडील जयेश हे मुलाला घेऊन व्हिलाच्या दरवाजाजवळ आले व तिथून ते पर्यटक टॅक्सीवाल्याकडे फोनवर बोलत होते. यावेळी व्योम याचा हात वडिलांच्या हातातून सुटला व तो जवळच असलेल्या जलतरण तलावाजवळ गेला आणि पाण्यात पडला.

चार-पाच मिनिटांनी फोन वरील संभाषण संपल्यानंतर मुलाच्या वडिलांनी मुलाचा शोध घेतला, तेव्हा त्यांना मुलगा जलतरण तलावात पडलेला आढळला. लगेच त्यांनी मुलाला तलावातून बाहेर काढले आणि व्हिलाच्या गाडीतून कांदोळी आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच साळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मुलाचा मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला. गुरुवारी शवचिकित्सा झाल्यानंतर मृतदेह पालकांच्या स्वाधीन केला जाणार आहे.

दरम्यान, या व्हिलाच्या जलतरण तलावाची देखरेख करण्यासाठी कुणीही कर्मचारी तैनात नव्हता. पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डॅव्हिड कॉस्ता करीत आहेत. 

हेही वाचा