पणजी : मेरशी जंक्शनजवळ वॅगन आर कारने धडक दिल्यामुळे विनोद नामक पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी कारचालक अविनाश कांता रेडकर (४०, वास्को) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
जुने गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी हवालदार आशीर्वाद नाईक यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, मेरशी जंक्शनजवळ वॅगन आर कारने मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी ४ वाजता एका पादचाऱ्याला धडक दिल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. ही माहिती कक्षाने जुने गोवा पोलिसांना दिली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशीर्वाद नाईक व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघाताचा पंचनामा केला. तसेच स्थानिकांनी अपघाताची माहिती १०८ रुग्णवाहिका आणि पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. त्यानुसार, रुग्णवाहिकेने जखमी पादचाऱ्याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात नेले. तिथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, पादचाऱ्याचे नाव विनोद (३०) असल्याचे समोर आले. पोलीस उपनिरीक्षक संकेत पोखरे यांनी अपघात प्रकरणी वॅगन आर कारचालक अविनाश कांता रेडकर (४०, वास्को) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून मंगळवारी रात्री अटक केली.