गेल्या १४ वर्षांत मुरगाव बंदरात १३२ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची हाताळणी

आयात कोळशाने घेतली गोव्याच्या लोहखनिज ​हाताळणीची जागा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January, 12:02 am
गेल्या १४ वर्षांत मुरगाव बंदरात १३२ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची हाताळणी

पणजी : गेल्या १४ वर्षांत मुरगाव बंदरावर १३२ दशलक्ष मेट्रिक टन कोळशाची हाताळणी करण्यात आली आहे. २०१० पासून आतापर्यंत कोळशाच्या हाताळणीत चौपट वाढ झाली आहे. मुरगाव बंदरात एकेकाळी मोठ्या प्रमाणात लोहखनिज हाताळले जात होते, परंतु आता त्यात घट झाली आहे आणि हळूहळू त्याची जागा कोळशाने घेतली आहे, असे मुरगाव बंदर प्राधिकरण (एमपीए) ने म्हटले आहे.

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या अहवालानुसार, वर्ष २०१०-११ मध्ये कोळशाची हाताळणी ६.९१ दशलक्ष मेट्रिक टनांवरून २०१६-१७ मध्ये १२.७५ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढली. तथापि, २०२२-२३ मध्ये ते किंचित कमी होऊन १०.६० दशलक्ष मेट्रिक टन आणि २०२३-२४ मध्ये १०.६४ दशलक्ष मेट्रिक टन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ०.६४ दशलक्ष मेट्रिक टनांनी वाढ झाली.

दरम्यान, ज्यावेळी राज्यात खाणकाम तेजीत होते, त्यावेळी मुरगाव बंदरात लोहखनिजाची जास्त हाताळणी होत होती. तथापि, २०१२ मध्ये खाणबंदी लागू झाल्यानंतर, लोहखनिजाने आपले स्थान गमावले आणि त्याची जागा कोळशाने घेतली. २०१०-११ मध्ये, लोहखनिजाची हाताळणी ४०.६२ दशलक्ष मेट्रिक टन होती. तथापि, २०१२ मध्ये खाणकाम बंदी लागू झाल्यामुळे, २०१३-१४ मध्ये लोहखनिजाची हाताळणी ०.०४ दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत कमी झाली. २०२३-२४ मध्ये लोहखनिज हाताळणी आता ४.९९ दशलक्ष मेट्रिक टनांवर पोहोचली आहे.

एमपीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरगाव बंदरात परदेशातून कोळसा आयात केला जातो आणि आम्ही गोव्यातून लोहखनिज निर्यात करतो. देशात स्टील प्लांट चालवण्यासाठी कोकिंग कोळसा आवश्यक आहे. गेल्या १४ वर्षांत, गोव्याने १३२ दशलक्ष मेट्रिक टन कोळसा आयात केला आहे तर १२७.९७ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिज निर्यात केले आहे. बंदरावर जेएसडब्ल्यू आणि अदानी या दोन खासगी कंपन्या कोळशाची हाताळणी करतात.

एमपीएमध्ये आली ४ हजार जहाजे

गेल्या आठ वर्षांत, एमपीएने ४,३९० जहाजे बंदरात हाताळली आहेत. आयात-निर्यातीसाठी दररोज सरासरी ७ जहाजे मुरगाव बंदरात लंगर घालतात.



हेही वाचा