सासरी हे भावनिक मायेचे नाते तयार व्हायला दोन्ही बाजूंनी मायेच्या घट्ट तंतूंची गरज त्या मायेच्या धाग्याला हवी असते. मायेच्या तंतूंनी धाग्यातील वीण विणायला पाहिजे. तेव्हाच मायेचा धागा घट्ट होतो.
“थँ क्यू मावशी!” म्हणत माझी भाची लगबगीने आपली बाईक स्टार्ट मारून ऑफिसला जायला निघाली सुध्दा. तिच्या ऑफिस युनिफॉर्मच्या शर्टचे बटन तुटले होते म्हणून ती कपाटात दुसरा युनिफॉर्म शोधत होती. त्यातल्या त्यात मी तिला बटन लावून दिले, तशी ती पटकन उरकून ऑफिसला पळाली सुद्धा. जाण्यापूर्वी आपण ऑफिसला वेळेवर पोहोचणार म्हणून आनंदित होऊन तिने मला घट्ट मिठी मारली.
ती निघून गेली आणि मी हातातल्या सुई-दोऱ्याकडे बघतच राहिले. इतक्यात घरातली बुजुर्ग - तिची दादी म्हणाली, “शिवणकाम विणकाम आले नाही तरी चालेल, पण लग्नानंतर या पोरीला नात्यांची विण मात्र अगदी घट्ट विणता आली म्हणजे मिळवली.” “आजकाल समाजात हळूहळू सैल होत चाललेली नात्याची वीण तिच्याही नजरेतून सुटली नव्हती. आपल्या हुशार, देखण्या, कमावत्या नातीबद्दल तिला जे काही म्हणायचे होते ते आम्हा बहिणींना अगदी व्यवस्थित समजले होते. आपल्या हुशार, देखण्या, कमावत्या नातीला चांगले सासर मिळणार हे तिला खात्रीने माहीत होते पण लग्नानंतर आपल्या नातीचे कसे होणार? सासरच्या माणसांशी ती कशी जुळवून घेणार? याची चिंता तिला सतावत होती. तिच्या हुशार, भरपूर पाच आकडी पगार दर महिन्याला कमावणाऱ्या नातीला सासर, सासू-सासरे, दिर, नणंदा असलेले मिळावे, एकमेकांना वेळप्रसंगी सांभाळणारी नात्याची माणसे मिळावी. प्रत्येक सण-उत्सव एकत्र येऊन सासरी साजरी करणारी नात्याची विण जशी आजवर तिला माहेरी लाभली, तशी सासरी लाभावी असेच दादिला वाटत होते. पण सासरी हे भावनिक मायेचे नाते तयार व्हायला दोन्ही बाजूंनी मायेच्या घट्ट तंतूंची गरज त्या मायेच्या धाग्याला हवी असते. मायेच्या तंतूंनी धाग्यातील वीण विणायला पाहिजे. तेव्हाच मायेचा धागा घट्ट होतो.
तसे पाहायला गेल्यास माणसाचे आणि सुई-धाग्याचे एक वेगळेच असे भावनिक नाते आहे... अगदी जन्मोजन्मीचे. जीवनात संघर्ष झेलताना, नाती टिकवताना कधी मनातील तर कधी काळजातील भावनांना दुखापत होणारच म्हणून त्यांचा परिणाम नात्यावर होता कामा नये. स्वार्थ, स्वाभिमान, अविश्वास या साऱ्यांचे घाव त्याच्या भावनिक धाग्यावर पडतील म्हणून नात्यांची विण सैल होऊ द्यायची नसते. स्त्रीचे आणि सुई-दोऱ्याचे एक वेगळेच जन्मोजन्मीचे नाते. भावनांनी भरलेल्या मन-हृदयाचे आणि तिचे एक वेगळेच अनमोल नाते. ‘धनाची पेटी’ म्हणून तिच्या पित्याच्या घरात ती जन्म घेते व कन्या, बहीण, मैत्रीण, आत्या, मावशी अशी असंख्य नाती गुंतत ती सांभाळीत एक दिवस उंबरठ्यावरचे माप ओलांडून ती सासरी प्रवेश करते. नवीन नात्यांच्या साऱ्या धाग्यांना विश्वासाच्या सुईने विणण्याचा संकल्प करते. एक भार्या म्हणून, एक स्नुषा म्हणून, मायेच्या विविध नात्यांना मायेच्या विविध धाग्यांनी ओवताना मानवी जीवनाशी निगडित कितीतरी मायेच्या धाग्यांशी निगडित तिचा सहवास असतो.
एका अर्थाने लग्नानंतर तिच्या जीवनात वेगवेगळी नवीन नाती प्रवेश करतात. ती कुणाची काकी होते, तर कोणाची मामी. प्रत्येक नाते विश्वासाच्या, आपलेपणाच्या सुईने ओवीत नात्यांचा धागा घट्ट करायचा हे मात्र काही अंशी तिच्या हातात असते. ही साधी वाटणारी घरातील नात्यांची विण... सासू-सासरे, नणंद-दीर ही नाती टिकवायला तिलाही वेळप्रसंगी तडजोड करण्याची, नमते घेण्याची गरज असते. आजकालच्या लाडात वाढलेल्या, उच्चशिक्षित, भरपूर कमावणाऱ्या मुलींना सासर हवे असते. पण सासरी सासू-सासरे, दिर-नणंदा नको असतात. नात्यातील संवादातून, एकीतून मिळणाऱ्या फायद्याचे महत्त्व तिला काही काळाने समजू लागते. तोपर्यंत वेळ हातातून गेलेली असते. नात्यातील दुराव्याने होणाऱ्या मानसिक आजारांना ती बळी पडू लागते. म्हणूनच तिला राग, लोभ, मत्सर, वाईट प्रसंग, वाईट विचार, मतभेद या साऱ्यांपासून जीवनातील नात्यांच्या धाग्याचे स्थान अबाधित ठेवायचे असते. या साऱ्यांची जरा तरी गाठ त्यांच्या धाग्याला पडली किंवा अडकली तर नात्यांचा धागा कमकुवत होतो. कधी कधी कायमचा तुटतो. तुटलेला मायेचा धागा जोडणे खूप मुश्किल असते. म्हणूनच मायेच्या नात्यातल्या धाग्यांना या गाठीपासून जरा दूर ठेवायचे असते. मन-हृदयातील नात्याचे स्थान या साऱ्या गोष्टीपासून अबाधित ठेवायचे असते. अगदी जीवनाच्या शेवटपर्यंत. तेव्हाच ती एक चांगली भार्या, सून, माता किंवा कालांतराने सासू, नानी किंवा दादी होण्याचा नात्यांच्या सन्मानाचा मुकुट परिधान करू शकते.
तिला नात्यांचा एक एक धागा विणत विणत जीवनातील, संसाराच्या नात्यांचे भरजरी वस्त्र विणायचे असते. आजकाल इंस्टाग्राम, किंवा फेसबुकवर अगदी सातासमुद्रापलीकडच्या नात्यात आपण गुंतत जातो. पण आपल्या कुटुंबातल्या सदस्याशी नातेसंबंध सांभाळताना तडजोड करताना स्वाभिमान, स्वार्थ यामुळे कुठेतरी आपण कमी पडतोच की... टाळी एका हाताने वाजत नाही तसेच नात्यांची विणही दोन्ही बाजूंच्या माणसावर अवलंबून असते. त्यांच्या तडजोडीवर अवलंबून असते. माझी आजी सांगायची, तिच्या तरूणपणात म्हणे नवऱ्यामुलीला वधू परीक्षेत सुईत धागा गुंतायला लावायचे. मुलीला भरतकाम, शिवणकाम येते की नाही तेही पाहिले जायचे. कदाचित या संयमाने ती विणकामाचा धागा जोडायची त्यात संयमाने ती नात्यांची धागे जोडू शकेल असा कदाचित त्यांचा विश्वास असावा असे मला वाटते. मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा संयमाचा धागा मानवी जीवनाला अंतरंगातून जोडतो हेच खरे.
शर्मिला प्रभू, फातोर्डा -मडगांव मो. ९४२०५९६५३९