बार्देश : म्हापसा पालिका निवडणुकीसाठी आमदार लोबो सक्रिय

गुप्तपणे हालचाली​ : प्रभागनिहाय उमेदवार चाचपणीस सुरुवात

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
7 hours ago
बार्देश : म्हापसा पालिका निवडणुकीसाठी आमदार लोबो सक्रिय

म्हापसा : येथील विद्यमान पालिका मंडळाचा कार्यकाळ मार्च २०२६ मध्ये संपुष्टात येणार असून नवीन नगरपालिका निवडणुकीला १४ महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी आतापासूनच म्हापशातील स्थानिक राजकारणात उतरण्याची रणनीती सुरू केली आहे. म्हापसा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा लोबो समर्थक उमेदवार पराभूत झाल्यामुळे यावेळी पालिका निवडणुकीत पॅनल उभे करण्याची तयारी लोबो यांनी चालवली आहे.
बार्देश तालुका राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. हा तालुका सात विधानसभा मतदारसंघामध्ये व्यापला गेला आहे. त्यात म्हापसा मतदारसंघ हा केंद्रबिंदू आहे. यापूर्वी काही राजकीय नेत्यांनी म्हापसा मतदारसंघात जम बसवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात यश आले नव्हते.
गेल्या १० वर्षांपासून कळंगुटचे आमदार मायकल लोबो हे म्हापसा शहर तसेच मतदारसंघाचा आवश्यक पायाभूत विकास झाला नसल्याचा आरोप उघडपणे करत होते. दिवंगत उपमुख्यमंत्री अॅड. फ्रान्सिस डिसोझा यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार जोशुआ डिसोझा यांना आमदार लोबो यांच्या टिकेला सामोरे जावे लागत आहे.
हल्लीच आमदार लोबो यांनी म्हापशाचे आमदार आणि नगरसेवकांना शहराचा कायापालट करण्यासाठी सुबुद्धी देण्याची मागणी श्री बोडगेश्वर चरणी केली होती. तसेच लोबो यांनी शहरातील सर्व २० प्रभागांमधील काही समाज कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच आगामी नगरपालिका निवडणुकीत आमदार जोशुआ डिसोझा व भाजप समर्थक पॅनल विरोधात पर्याय म्हणून आपले पॅनल उतरविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.
गेल्या एप्रिल-मे २०१९च्या विधानसभा पोटनिवडणुकीत आणि फेब्रुवारी-मार्च २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत आमदार मायकल लोबो यांनी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कांदोळकर यांना पाठिंबा दिला होता. मात्र या दोन्ही निवडणुकीत कांदोळकर पराभूत झाले व उपसभापती जोशुआ डिसोझा हे विजयी ठरले होते.
आता २०२७ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगरपालिका निवडणुकीत आपले पॅनल उभे करून म्हापशातील राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत वर्चस्व प्राप्त करण्याचा आमदार लोबो यांचा प्रयत्न आहे. यासाठी गुप्तपणे उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. आमदार जोशुआ डिसोझा यांच्या कार्यपद्धतीवर असंतुष्ट नसलेल्या सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील समाज कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

निवडणुकीआधीच उमेदवार निश्चितीचे प्रयत्न
नगरपालिका निवडणूक मार्च २०२६ मध्ये होणार असून तोपर्यंत म्हापसा पालिकेच्या सर्व २० प्रभागांतील उमेदवार निश्चित करण्याचा विचार आमदार लोबो यांचा असल्याची माहिती लोबो समर्थक एका समाज कार्यकर्त्याने दिली.                         

हेही वाचा