गोवा : विधानसभा अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी २३ जानेवारी रोजी होणार बैठक

६ व ७ फेब्रुवारी रोजी असेल विधानसभा अधिवेशन

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th January, 04:22 pm
गोवा : विधानसभा अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी २३ जानेवारी रोजी होणार बैठक

पणजी : नवीन वर्षी होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी विधानसभा कामकाज समितीची बैठक २३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता विधानसभा संकुलात होणार आहे. दोन दिवशीय अधिवेशनाचे कामकाज चर्चा करून बैठकीत ठरविले जाईल.

विधानसभा सचिव नम्रता उल्मन यांनी ही माहिती दिली. विधानसभा अधिवेशन ६ व ७ फेब्रुवारी असे दोन दिवस असेल. वर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने सुरवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. गुरूवार ६ फेब्रुवारी रोजी राज्यपालांचे अभिभाषण होईल. अन्य कोणतेही कामकाज होणार नाही. दुसऱ्या दिवशी शुक्रवार असल्याने खासगी कामकाजाचा दिवस असेल. आमदारांचे खासगी ठराव चर्चेला घेतले जातील. शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना तसेच खासगी ठराव किती घ्यायचे, यावर बैठकीत चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह वीजमंत्री सुदिन ढवळीकर, आमदार विजय सरदेसाई, विरोधी पक्ष नेते युरी आलेमांव, आमदार वेंझी व्हिएगस हे कामकाज सल्लागार समितीचे सदस्य आहेत. 

दोन दिवसांचे अधिवेशन निश्चित केल्याबद्दल काँग्रेस, गोवा फॉरवर्ड तसेच आपने टीका केली होती. अभिभाषणामुळे केवळ एका दिवसाचेच अधिवेशन होणार असल्याने प्रश्न उपस्थित करण्यास संधीच मिळणार नसल्याचे मत विरोधी पक्षांनी व्यक्त केले आहे.