अस्तित्त्वात नसलेल्या हॉटेल्सच्या नावे वेबसाईटवरून पर्यटकांना गंडा

चौघे जण ताब्यात : गोवा पोलिसांनी उघड केला घोटाळा; २०२२ पासून प्रकार सुरू

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
6 hours ago
अस्तित्त्वात नसलेल्या हॉटेल्सच्या नावे वेबसाईटवरून पर्यटकांना गंडा

पत्रकार परिषदेत माहिती देताना उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल. बाजूला आयपीएस अधिकारी मयंक दुबे आणि अरुण बलगोत्रा.

पणजी : २०२२ पासून विविध संकेतस्थळांवर अस्तित्त्वातच नसलेल्या हॉटेल्सची माहिती आणि फोटो वापरून बुकिंग घेत अनेक पर्यटकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका सिंडिकेटचा गोवा पोलिसांनी  पर्दाफाश केला. याप्रकरणी गोवा पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत एकास ग्वाल्हेर येथून तर तिघांना हैदराबाद येथून ताब्यात घेत गोव्यात आणून अटक केली.             

याबाबत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी माहिती दिली. पणजी पोलीस मुख्यालयात अायोजित पत्रकार परिषदेत आयपीएस अधिकारी मयंक दुबे आणि अरुण बलगोत्रा हजर होते.              

संशयित स्वतः हॉटेल मालक असल्याचे भासवत अस्तित्त्वात नसलेल्या हॉटेल्सचे फोटो आणि माहिती बुकिंग डॉट कॉम सारख्या अधिकृत वेबसाईट्सवर टाकत. इतर हॉटेल्स आणि बंगल्यांच्या तुलनेत या संशयितांनी लिस्ट केलेल्या हॉटेल्सची किंमत लक्षणीयरीत्या कमी असायची. यामुळे पर्यटक आपसूकच या लोकांच्या जाळ्यात ओढले जायचे. पर्यटकांकडून आगावू रक्कम  घेतल्यानंतर हे संशयित गायब व्हायचे, अशी माहिती यावेळी अधीक्षक कौशल यांनी दिली.             

याप्रकरणी आयपीएस अधिकारी मयंक दुबे व अरुण बलगोत्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हणजुण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरज गावस, उपनिरीक्षक संहिल वारंग, रमेश हरिजन तसेच कळंगुट पोलीस स्थानकाचे शिपाई राज परब यांच्या पथकाने जयपूर (मूळ ग्वाल्हेर) येथून एकास तर हैदराबाद येथील तिघांना ताब्यात घेतले व गोव्यात आणत त्यांना रीतसर अटक करण्यात आली. अशी माहिती कौशल यांनी दिली. आरोपी सौरभ (ग्वाल्हेर), सय्यद अली मुख्तार, मोहम्मद फिरोज आणि मोहम्मद अझरूद्दीन सैफ (हैदराबाद) यांना अटक करत चौकशी केल्यानंतर सदर घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचे त्यांनी मान्य केले. 

५०० पर्यटकांची लुबाडणूक

अशाच प्रकारे अनेकांना लुबाडण्यात आल्याच्या तक्रारी गोवा पोलिसांकडे आल्या आहेत. या विषयी अधिक खोलवर तपास केला असता तब्बल ५०० पर्यटक या घोटाळ्याला बळी पडले असल्याचेही उघड झाले आहे. या सर्वांशी संपर्क साधून त्यांच्या तक्रारी नोंदवण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार २०२२ पासून सुरू आहे. हे प्रकरण नेमके किती खोलवर गेले आहे, याचाही तपास सुरू आहे, असे कौशल म्हणले.